जिल्हा परिषद अविश्वास ठरावप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते विकले गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 07:42 PM2019-05-03T19:42:55+5:302019-05-03T19:43:07+5:30
जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि अपक्षाने दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अध्यक्षपदासह सहाही पदे घेऊन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले.
यवतमाळ : जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे बांधकाम व अर्थ सभापती निमिष मानकर यांच्याविरुद्ध शुक्रवारी ५९ विरुद्ध ० मतांनी अविश्वास ठराव पारित झाला. यानंतर माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत निमिष मानकर यांच्यासह माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी राष्ट्रवादीचे नेते विकले गेले, असा घणाघाती आरोप केला.
जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि अपक्षाने दोन वर्षांपूर्वी सत्ता स्थापन केली. तत्पूर्वी आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अध्यक्षपदासह सहाही पदे घेऊन सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले. त्याला भाजपने बाहेरून पाठिंबा देण्याचे घोषित केले होते. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार मनोहरराव नाईक यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, असा आरोप माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी केला. यानंतर भाजप-काँग्रेस व आम्ही सत्तास्थापनेचा निर्णय घेतला. आमच्याकडे ३१ सदस्य झाले होते. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीच्या उर्वरित दहा सदस्यांनीही सोबत येण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी राष्ट्रवादीच्या दहा सदस्यांना प्रत्येकी तीन लाख तर नेते असलेले आमदार मनोहरराव नाईक यांना २० लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप बाजोरिया यांनी केला. आता याच दहा सदस्यांनी राष्ट्रवादीच्या सभापतीविरुद्ध अविश्वास ठरावात महत्त्वाची भूमिका बजावल्याने सदस्य व नेत्यांनी आपले पैसे परत करावे, असे आवाहनही बाजोरिया यांनी केले.
नाईक यांच्या घरात अनेक वर्षे सत्ता असताना त्यांनी कोणत्याही जिल्हा परिषद व नगरपरिषद सदस्याला विकास निधी दिला नाही. उलट आपण आमदार असताना अनेक सदस्यांना विकास निधी दिल्याचे बाजोरिया यांनी सांगितले. यावेळी पायउतार झालेले बांधकाम सभापती निमिष मानकर यांनीही आपण गेली दोन वर्षे प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे काम केल्याचे सांगितले. विविध कामांमधील अनियमितता चव्हाट्यावर आणून त्याची तक्रार केल्याने आपल्याविरुद्ध अविश्वास आणला गेला, असा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, यापैकी पुसद विभागातीलच बहुतांश विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सोबतच तक्रार करू नये म्हणून आपल्यावर अनेकदा दडपण आणले गेले, असेही मानकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेत अनियमितता होत होती. त्याला विरोध केला, तक्रारी केल्या म्हणूनच आपल्यावर अविश्वास ठराव आणला गेल्याचे त्यांनी सांगितले. अविश्वासाच्या चर्चेत आपल्याविरुद्ध वारंवार सदस्यांचा अपमान करतो, कामकाज चांगले नाही, असा आरोप करण्यात आला. मात्र त्यावर मुद्देसूद उत्तर कुणीही दिले नाही. शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड यांनी ३१ मार्चचा हिशेब ३१ मार्चलाच बंद केल्याचा आरोप चर्चेत केला होता. शासकीय नियमानुसार ३१ मार्चलाच सर्व हिशेब बंद होता, असेही मानकर यांनी सांगितले.
आरोप अत्यंत चुकीचे - आमदार नाईक
लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्याविरोधात निमिष मानकर यांनी खुलेआम काम केले. त्याचवेळी त्यांना पक्षातून काढून टाकले. आता मानकर राष्ट्रवादीचे सदस्य नाही, असे राष्ट्रवादीचे आमदार मनोहरराव नाईक यांनी सांगितले. पैशाचा आणि माझा काहीही संबंध नाही. नाईक हे पैसे घेणारे नाहीत. माजी आमदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आमदार मनोहरराव नाईक यांनी सांगितले.