राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली

By admin | Published: June 8, 2014 12:09 AM2014-06-08T00:09:55+5:302014-06-08T00:09:55+5:30

राज्यपालांच्या कोट्यातून आर्णीच्या ख्वाजा बेग यांना विधानपरिषद सदस्यत्व मिळाल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी वाढली आहे.

NCP's strength increased | राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली

Next

ख्वाजा बेग विधानपरिषदेवर : एक मंत्री, दोन आमदार
यवतमाळ : राज्यपालांच्या कोट्यातून आर्णीच्या ख्वाजा बेग यांना विधानपरिषद सदस्यत्व मिळाल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी वाढली आहे.
मनोहरराव नाईक यांच्या निमित्ताने पुसदचा गड आणि मंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. संदीप बाजोरिया हे राष्ट्रवादीचे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषद सदस्य आहेत. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता आहे. यवतमाळ पंचायत समितीसुद्धा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि सहकारातील संस्था राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या ताब्यात आहेत. त्यातच आता ख्वाजा बेग यांना आमदारकी देवून पक्षश्रेष्ठींनी जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढविली आहे. काँग्रेसकडून अल्पसंख्यकांना नेहमीच खूश करण्याचा प्रयत्न होतो. त्यात आता आपणही मागे नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवून दिले आहे. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विधानपरिषद सदस्यांची संख्या आता समान झाली आहे. गेल्यावेळी सात पैकी केवळ पुसद या एका विधानसभा मतदारसंघात लढणार्‍या राष्ट्रवादीने यावेळी यवतमाळ व दिग्रस या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यातही यवतमाळ मतदारसंघासाठी त्यांचा आग्रह आहे. अनेक वर्षांपासून जणू राजकीय अज्ञातवासात असलेल्या ख्वाजा बेग यांना विधानपरिषदेवर संधी देवून मुख्य प्रवाहात आणण्यात आले आहे. त्याचा कितपत फायदा आगामी
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.
१९९९ च्या निवडणुकीत संजय देशमुख यांच्याविरोधात १२६ मतांनी पराभूत झाल्यानंतर ख्वाजा बेग यांना पुनर्वसनाचा शब्द दिला गेला होता. मात्र हा शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तब्बल १२ ते १४ वर्ष लागली, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)
 

Web Title: NCP's strength increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.