बेंबळा प्रकल्पातील 'अमृत' निर्विघ्न टाकळीपर्यंत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 05:00 AM2021-07-28T05:00:00+5:302021-07-28T05:00:07+5:30

बेंबळा प्रकल्पावरील जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर एकूण आठ मोटारपंप आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर या सर्व पंपाद्वारे पाणी उपसले जाणार आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातही नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यावरून जोडण्या देण्यात आल्या. अजूनही काही ठिकाणीची कामे सुरू आहेत. पुढील काळात निळोणा, चापडोह आणि बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार आहे. 

The 'nectar' of the Bembala project reached smooth flow | बेंबळा प्रकल्पातील 'अमृत' निर्विघ्न टाकळीपर्यंत पोहोचले

बेंबळा प्रकल्पातील 'अमृत' निर्विघ्न टाकळीपर्यंत पोहोचले

Next
ठळक मुद्देचार वर्षांपासूनची उत्सुकता : १८ किलोमीटरवर पाणी आणण्यात यश

विलास गावंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेंबळा प्रकल्पाचे पाणी टाकळी येथील फिल्टर प्लांटपर्यंत पोहोचविण्यात प्राधिकरण मंगळवारी यशस्वी झाले. विघ्नांची मालिका घेऊन एक एक टप्पा पार पाडताना चाचणी निर्विघ्न पार पडली. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास टाकळीत पाणी येऊन पोहोचल्यानंतर आता यवतमाळकरांना काही महिन्यातच या पाण्याची चव चाखायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
यवतमाळ शहराची पुढील काळातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता ३०२ कोटी रुपयांची अमृत योजना सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आली. बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे पाणी यासाठी घेतले जाणार आहे. यासाठी बेंबळा प्रकल्पावर जॅकवेलपासून टाकळी प्रकल्पापर्यंत एक हजार मी.मी.ची पाईप लाईन टाकण्यात आली होती. यासाठी वापरलेले निकृष्ट पाईप अनेक ठिकाणी फुटले. लोकांची शेतं जलमय होऊन नुकसान झाले.
संपूर्ण पाईपलाईनच सदोष असल्याने १८ किलोमीटर पाईप बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामालाही दीर्घ कालावधी लागला. नवीन पाईपलाईनची चाचणी सुरू झाली. यातही बहुतांश ठिकाणी लिकेज निघाले. 
आठवडाभरापूर्वी पाईप धुवून स्वच्छ करण्यात आले. टाकळी येथील फिल्टर प्लांटमध्ये मंगळवारी पाणी सोडण्याचे ठरले. यानुसार सकाळी १०.३० वाजता जॅकवेलवरील ५७० एचपीची एक मोटर सुरू करून पाणी सुरू करण्यात आले.
बेंबळा प्रकल्पावरील जाकवेल आणि फिल्टर प्लांटवर एकूण आठ मोटारपंप आहेत. योजना पूर्ण झाल्यानंतर या सर्व पंपाद्वारे पाणी उपसले जाणार आहे. या योजनेअंतर्गत यवतमाळ शहरातही नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. त्यावरून जोडण्या देण्यात आल्या. अजूनही काही ठिकाणीची कामे सुरू आहेत. पुढील काळात निळोणा, चापडोह आणि बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळकरांना मिळणार आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कामाची पाहणी
- अमृत योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित यंत्रणेशी सतत संपर्क ठेवला. 
- मंगळवारी बेंबळाचे पाणी फिल्टर प्लांटवर पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. कामाची गती वाढविण्याची अपेक्षा त्यांनी केली.
- योजनेच्या अनेक कामांचाही आढावा त्यांनी संबंधित यंत्रणेकडून घेतला. योजनेसंबंधी अनेक विषयांची माहिती त्यांनी जाणून घेतली. 

यवतमाळकरांना तीन महिने प्रतीक्षा
बेंबळाचे पाणी मिळण्यासाठी यवतमाळकरांना आणखी किमान तीन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. फिल्टर प्लांटचे आणखी १५ ते २० टक्के काम शिल्लक आहे. शिवाय टाकळीपासून प्राधिकरणाच्या गोदणी रोडवरील कार्यालयापर्यंत टाकण्यात आलेल्या ८०० एमएम पाईपची पूर्ण चाचणी व्हायची आहे.

कामाची गती अजूनही संथ
अमृत योजनेचे काम नाशिकच्या आडके कंपनीला देण्यात आले आहे. सुरुवातीपासूनच कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे. योजना पूर्ण करण्याचा कालावधी दोन वर्षांपूर्वीच संपला. पालकमंत्री, प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी या कंत्राटदाराला तंबी दिली. शिवसैनिकांनी आंदोलन केले. अजूनही कामाची अपेक्षित गती वाढलेली नाही. कंत्राटदाराच्या कामाची गती आता आहे तशीच राहिल्यास योजना पूर्ण होण्याचा कालावधी लांबणीवर पडणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

तर २४ तास पाणी मिळेल पण...
अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर यवतमाळकरांना २४ तास पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र, यासाठी किमान सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. तीनही मुख्य संतुलन टाक्यांची कामे पूर्ण व्हायची आहेत. एका टाकीचे बांधकामच सुरू आहे. मोटर पंपासाठी आवश्यक तेवढी वीज उपलब्ध नाही. पम्प हाऊसचे काम पूर्ण झालेले नाही.

दर वाढण्याचे संकेत
बेंबळा प्रकल्पाचे पाणी सुरू झाल्यानंतर पाण्याचे दर वाढण्याचे संकेत मिळाले आहे. या योजनेचा खर्च अवाढव्य आहे. विदुयत बिलासाठीच सध्या दरमहा पाच लाख रुपये मोजावे लागत आहे. आणखी सहा पंपासाठी वीज घ्यावी लागणार आहे. इतर प्रकारचाही खर्च वाढणार असल्याने पाण्याचे दरही चांगलेच फुगेल, असे दिसते.

 

Web Title: The 'nectar' of the Bembala project reached smooth flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.