सामाजिकतेचे भान ठेवणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:13 PM2018-01-27T22:13:13+5:302018-01-27T22:13:31+5:30
प्रत्येक समाजात चांगले आचार-विचार आहेत. विविध समाजाच्या रूढी, परंपरा जपल्या पाहिजे.
आॅनलाईन लोकमत
आर्णी : प्रत्येक समाजात चांगले आचार-विचार आहेत. विविध समाजाच्या रूढी, परंपरा जपल्या पाहिजे. पण शासनाने धोरणात्मक बदल करताना सामाजिकतेचेही भान जपणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
शनिवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार ख्वाजा बेग यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विविध विषयांवर चर्चा करताना त्यांनी समाजाच्या प्रश्नांवरही आपले मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ट्रिपल तलाकवर सभागृहात मत व्यक्त करताना आपण आई, पत्नी व मुलगी आहो याचा विचार डोक्यात आला आणि या विषयावर परखड मत व्यक्त केले. आपण मांडलेल्या मताविषयी कुणाला काय वाटेल, याचा विचार केला नाही. मुस्लीम समाजातील महिलांनी पत्र पाठवून आपले अभिनंदन केले. त्यामुळे मी स्वत:ला धन्य समजते, असे त्या म्हणाल्या.
आमदार ख्वाजा बेग यांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. त्यांच्या कार्याचा पक्षाला निश्चितच फायदा होत आहे, असे सांगून पुन्हा आर्णीला येण्याचे आश्वासन देत नागपूरसाठी त्या रवाना झाल्या. यावेळी मुस्लीम समाजातील महिलांनी खासदार सुप्रिया सुळे यांना अभिनंदनाचे पत्रही दिले.
यावेळी माजी आमदार संदीप बाजोरिया, डॉ. आरती फुफाटे, ययाती नाईक, क्रांती धोटे, नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते चिराग शहा यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.