कुणबी समाजाबद्दल इतरांची मानसिकता बदलण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:10 PM2018-01-13T22:10:16+5:302018-01-13T22:12:35+5:30
कुणबी समाजच शेती व्यवसाय, वतनदारी, राजकारणात पुढे असल्याची मानसिकता इतर समाजात निर्माण झाल्याने अनेकदा रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे इतरांची मानसिकता बदलून सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : कुणबी समाजच शेती व्यवसाय, वतनदारी, राजकारणात पुढे असल्याची मानसिकता इतर समाजात निर्माण झाल्याने अनेकदा रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे इतरांची मानसिकता बदलून सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे मत विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.
माजी आमदार दिवंगत बाळासाहेब घुईखेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथे राज्यस्तरीय सर्व शाखेय मराठा-कुणबी समाज उपवर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षीय भाषणात ना.ठाकरे बोलत होते. खासदार भावनाताई गवळी, व्यसनमुक्ती सम्राट मधुकरराव खोडे महाराज, माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार विजयाताई धोटे, अॅड. जीवन पाटील, सुरेखाताई ठाकरे, सुशीलाताई पाटील, विजयाताई घुईखेडकर, पुष्पाताई नागपुरे आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले, सध्याची सामाजिक स्थिती बघता असे कार्यक्रम घेऊन शक्तीप्रदर्शन करणे महत्त्वाचे आहे. मराठा आरक्षण, क्रिमिलेअर यावर राज्य सरकारवर टीका करीत समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची त्यांनी ग्वाही दिली. खासदार भावना गवळी, मधुकरराव खोडे महाराज, राजाभाऊ ठाकरे, विजयाताई धोटे, सुरेखा ठाकरे आदींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.
दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपवर-वधुंची संपूर्ण माहिती असणाºया परिचय पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यानंतर झालेल्या कार्यक्रमात दोनशेच्यावर उपवर-वधुंनी आपला परिचय दिला. यशस्वीतेकरिता आयोजक डॉ. संगीता वसंतराव घुईखेडकर व सर्व शाखेय महिला मराठा-कुणबी समाज व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.