कोरोनाला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:38 AM2021-04-26T04:38:23+5:302021-04-26T04:38:23+5:30

दारव्हा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या, मृत्युदर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या आजाराला रोखण्यासाठी युद्धपातळीवर सामूहिक प्रयत्न करण्याची गरज ...

The need for collective efforts to prevent corona | कोरोनाला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

कोरोनाला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

Next

दारव्हा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या, मृत्युदर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या आजाराला रोखण्यासाठी युद्धपातळीवर सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत माजी वनमंत्री तथा आमदार संजय राठोड यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील कोरोना आजारासंबंधी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील विश्रामगृहात बैठक पार पडली. यावेळी बोलताना आमदार राठोड यांनी या संकटावर मात करण्याकरिता प्रशासनासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार सुभाष जाधव, मुख्याधिकारी धीरज गोहाड, बीडीओ राजीव शिंदे, ठाणेदार यशवंत बावीस्कर, टीएचओ डॉ.मुकेश खांदवे उपस्थित होते.

येथील उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून रुग्णांना तालुक्यातच उपचार मिळेल, या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी पर्यायी मार्ग शोधावा, ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि इतर आवश्यक औषध पुरवठा सुरळीत राहील, यावर लक्ष केंद्रित करून संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर, लसीकरण याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना आमदार राठोड यांनी प्रशासनाला दिल्या.

सुरुवातीला ॲक्टिव्ह रुग्णसंख्या, चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबिंबित क्षेत्र, लसीकरण, कोविड सेंटरवरील व्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख राजू दुधे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सुशांत इंगोले, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.

बाॅक्स

ऑक्सिजन प्लांट दोन दिवसांत सुरू करा

आमदार संजय राठोड यांनी उपजिल्हा रुग्णालयात नव्याने सुरू होत असलेल्या ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन माहिती घेतली. सध्या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना वणवण भटकावे लागत आहे. ही भटकंती थांबविण्यासाठी पुढील दोन दिवसांत हा प्लांट सुरू करा, अशा सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.विक्रमसिंह कदम उपस्थित होते.

बॉक्स

रुग्णसंख्या वाढू नये म्हणून प्रयत्न

मतदार संघातील दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा आमदार संजय राठोड यांनी घेतला. रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच रुग्णसंख्या आणखी वाढू नये, यासाठी आपला नियमित पाठपुरावा सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The need for collective efforts to prevent corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.