Maharashtra Election 2019; राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 02:05 PM2019-10-14T14:05:53+5:302019-10-14T14:06:55+5:30
विरोधी पक्ष उभा करण्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे सोमवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: देशात, राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असून ती थांबविण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज असल्याचे मत व्यक्त करून हा विरोधी पक्ष उभा करण्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे सोमवारी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांसाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वषार्पूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगून आपल्या जाहिरनाम्यात भाजप, शिवसेनेने कोणकोणती वचने दिली होती, त्याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आज संकटात आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही बाब अभिमानाची नसल्याचेही त्यांनी सांगितले. आजही शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतच असल्याचे ते म्हणाले. नोटबंदीमुळे देशात मंदी आली असून त्यामुळे विविध उद्योगातून कर्मचाºयांना काढून टाकले जात आहे. पुढे ३० टक्के सरकारी कर्मचाºयांनाही नोकरीवरून काढले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार, ज्येष्ठ नेते विठ्ठल लोखंडकर, अनिल शिदोरे, मनसेचे वणी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजू उंबरकर, वरोरा-भद्रावती मतदार संघाचे उमेदवार रमेश राजूरकर, राजूरा मतदार संघाचे उमेदवार महालिंग कंठाळे प्रामुख्याने उपस्थित होते.