सामाजिक समतेसाठी प्रयत्नांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:31 PM2018-06-26T23:31:03+5:302018-06-26T23:34:12+5:30
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली. दूरदृष्टी असलेल्या या लोकनेत्याने समाजातील दुर्बल, मागासलेल्या घटकांसाठी अनेक धोरणे राबविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली. दूरदृष्टी असलेल्या या लोकनेत्याने समाजातील दुर्बल, मागासलेल्या घटकांसाठी अनेक धोरणे राबविली. त्यांनी सांगितलेल्या सामाजिक समतेच्या विचारांची आजही आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त किशोर भोयर, जात पडताळणी समितीचे उपायुक्त सुनील वारे, नगरपरिषद आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, अनिल आडे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावीत प्राविण्य मिळविणारे अनिकेत निकाडे, किरण जमधाडे, मेघा मुरादे, गीतांजली वाघमारे, यश चव्हाण, रोहित जाधव, सलोनी खोब्रागडे, प्रज्वल मुनेश्वर, दिव्यानी डहाके, पल्लवी खैरमोडे यांना राजर्षी शाहू महाराज गुणवंत पुरस्कार, अर्चना गेडे, वैष्णवी गजभिये, संदीप खंदारे यांना स्वाधार योजनेंतर्गत पुरस्कार देण्यात आला. वैभव गोरे व अभिषेक पोटे यांना जातपडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले. अनुसूचित जाती निवासी शाळेचे शिक्षक एस.एस. पडाळ, शिक्षिका एम.बी. भोयर आणि ताई भरजाडे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त किशोर भोयर यांनी केले. संचालन प्रा. कमल राठोड यांनी तर आभार जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी मंगला मून यांनी मानले. कार्यक्रमाला माजी समाजकल्याण अधिकारी गवई, दलितमित्र पुरस्कारप्राप्त शिवराम करके, देवण्णा पालेवाल, श्रावण सोनोने, प्रल्हाद सिडाम, भगवान मुदाने, अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त केशव लोढे आदी उपस्थित होते.