समाजातील आदर्श शोधायची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:46 PM2017-09-15T23:46:30+5:302017-09-15T23:46:46+5:30
आपल्या जगण्यातून माणुसकीचे नाते सिद्ध करणारे असंख्य आदर्श माणसे गावोगावी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आपल्या जगण्यातून माणुसकीचे नाते सिद्ध करणारे असंख्य आदर्श माणसे गावोगावी आहेत. माणसात देवत्व शोधणारे कर्मयोगी वेगवेगळ्या प्रकारे समाजसेवा करीत आहेत. प्रत्येकाची तºहा वेगळी असली तरी, या जन्मावर या जगण्यावर प्रेम करणारी आदर्श माणसे समाजात आहेत. गरज आहे ती त्यांचा शोध घेण्याची आणि त्यांच्याप्रमाणे आपल्या जीवनाला दिशा देण्याची, असे विचार प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी मांडले.
जिल्हा अभियंता ग्रुपद्वारे भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया जयंती निमित्त येथील जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात ‘या जन्मावर या जगण्यावर’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी ‘कसं जगावं’ या विषयावर दिलखुलास मत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी जिल्हा अभियंता ग्रुपचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता योगेश लाखानी होते. अभियंता प्रदीप कुळकर्णी, अभियंता सोहन मडघे, अभियंता अमित मिश्रा, अभियंता सुनील मुटकुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. देशमुख पुढे म्हणाले, जगताना माणसाने वर्षाऋतुच्या मोरासारखे संपूर्ण पिसारा फुलवून जगावे. दैनंदिन जीवन जगताना आयुष्य नुसतेच वाहून गेले, अखरे जगायचे राहून गेले, असे वाटता कामा नये. जीवन अर्थपूर्ण जगण्याचा ध्यास असावा लागतो. आपल्या मुलांकडे संपत्ती संक्रमित करताना सामाजिक सद्भावनाही संक्रमित केली तर जगण्याचे मूल्य निश्चितच वाढते. इतरांसाठी जगणे हीच माणुसकीची ओळख आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील असामान्य कर्तृत्व करणाºयांची ओळख त्यांनी आपल्या भाषणात करून दिली.
यावेळी अभियंता ग्रुपद्वारे गुणवंत पाल्यांचे कौतुक, पदोन्नत अभियंत्यांचा आणि निवृत्त अभियंत्यांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अभियंता विलास चावरे यांनी केले. यावेळी वेगवेगळ्या विभागातील अभियंते सहकुटुंब उपस्थित होते.