सोयाबीनला पर्याय उभा करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 05:00 AM2020-11-07T05:00:00+5:302020-11-07T05:00:02+5:30
अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल होवून ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ हा मार्ग अवलंबू लागला आहे. ही परिस्थिती का आली, याचे अध्ययन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.
n लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांनी बहुतेक क्षेत्र व्यापल्याने पिकांचा फेरपालट होण्यासाठी फारसे पर्याय राहिलेल नाही. मागील पाच वर्षातील सोयाबीन पिकांच्या उत्पन्नाचा आढावा घेतला असता सोयाबीनला पर्यायी पीक उभे करण्याची गरज दिसून येत आहे. हा निष्कर्ष यवतमाळ येथील सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनातून काढण्यात आला आहे.
अतिशय प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे सर्वस्तरातून, सर्व बाजूंनी शोषण होते, ही वस्तूस्थिती आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सर्वाधिक फटका भुमिपूत्रांना बसतो. यावर्षी परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले. आधीच आर्थिक मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल होवून ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ हा मार्ग अवलंबू लागला आहे. ही परिस्थिती का आली, याचे अध्ययन या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.
यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि नांदेड या जिल्ह्याच्या २२ तालुक्यातील ९४ गावात ४४२ शेतकऱ्यांच्या भेटी घेवून या विद्यार्थ्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. तसा अहवाल तयार करण्यात आला. ५० टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सदोष असल्याने दुबार पेरणी करावी लागली. अशा बियाण्यांबाबत कंपन्यांसह शासकीय यंत्रणेवर कठोर कारवाई व्हावी, शक्य झाल्यास शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने बियाण्यांचे संरक्षण करावे, असा निष्कर्ष सोयाबीनबाबत मांडण्यात आला आहे.
देशातील शेतमालाचे दर इतर जीवनावश्यक नसणाऱ्या गोष्टींच्या तुलनेत खूप कमी आहे. किमान उत्पन्न मिळविणाऱ्या कुटुंबालासुद्धा ते परवडणारे आहे. या दरामध्ये कुठल्याही कारणाने थोडी वाढ झाली की आकांत करणे आपण थांबविले पाहिजे, असे अहवालात नमूद केले आहे.
नुकसान झाल्यानंतर पिकांचा विमा मिळण्याचे प्रमाण खूप कमी आहे. विमा कंपन्यांनी तात्काळ भरपाई द्यावी, अशा सूचना शासनाने या कंपन्यांना कराव्या, अशी शेतकरी वर्गाची विनंती असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रा. घनश्याम दरणे, प्रा. सीमा शेटे, प्रा. कल्पना राऊत, प्रा. प्रशांत कराळे या संशोधक गटाने शेती आणि शेतकरी याबाबत सर्वेक्षणात अनेक निष्कर्ष काढले आहेत.
या अहवालाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांच्या हस्ते समाजकार्य महाविद्यालयात झाले. अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. रमाकांत कोलते हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.डाॅ. अविनाश शिर्के यांनी केले. प्रा. घनश्याम दरणे यांनी अनुभव सांगितले. संचालनाची जबाबदारी प्रा.डाॅ. सीमा शेटे यांनी पार पाडली.