मांगलादेवी केंद्रात बाळंतिणीची उपेक्षा

By admin | Published: January 13, 2017 01:32 AM2017-01-13T01:32:39+5:302017-01-13T01:32:39+5:30

आरोग्य केंद्रात प्रसूत होणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्याची पंतप्रधानांची घोषणा ताजी आहे.

Neglect in child labor at the Mangladevi Center | मांगलादेवी केंद्रात बाळंतिणीची उपेक्षा

मांगलादेवी केंद्रात बाळंतिणीची उपेक्षा

Next

ढिसाळ यंत्रणा : उपसरपंचाची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार
नेर : आरोग्य केंद्रात प्रसूत होणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्याची पंतप्रधानांची घोषणा ताजी आहे. मात्र ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात गर्भवतींचे प्रचंड हाल होत असल्याचा प्रकार तालुक्यात उघड झाला. रात्री ९.३० वाजता प्रसवकळा सोसत आलेल्या महिलेला आरोग्य केंद्राच्या दारावर कुलूप दिसले. तिच्या पतीने आरोग्य सेविकेपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत फोनाफोनी करून पाहिली. पण सारेच व्यर्थ गेले. साधी रुग्णवाहिकाही उपलब्ध होऊ शकली नाही. अखेर या गरिब महिलेला खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागली.
तालुक्यातील मांगलादेवी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात घडलेल्या या प्रकाराने आरोग्य यंत्रणनेचे भयानक वास्तव चव्हाट्यावर आले आहे. मांगलादेवी येथील उपसरपंच प्रमोद पुनसे यांची पत्नी स्वाती हिला ७ जानेवारीला मांगलादेवीच्या उपकेंद्रात बाळंतपणासाठी रात्री नेण्यात आले. मात्र उपकेंद्र बंद होते. आरोग्यसेविका अलोणे यांचा फोन बंद होता. येथील कर्मचारी बाहेरगावावरून ये-जा करतात. त्यामुळे येथील नागरिकांना निट आरोग्यसेवा मिळत नाही. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा केवळ कागदोपत्री आहेत. जनतेचे मात्र हाल सुरू असल्याचे अशा घटनांवरून वारंवार दिसून येते.
प्रमोद पुनसे यांनी माणिकवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क केला असता वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. निदान इतर रुग्णालयात नेण्यासाठी दवाखान्याची गाडी पाठवा अशी विनंती केली. मात्र वाहनचालकाची परीक्षा असल्याने तो रजेवर असल्याचे सांगण्यात आले. रात्री ग्रामीण भागात कोणतीही सोय उपलब्ध नसताना नागरिकांचे हाल होतात. मांगलादेवी व माणिकवाडा येथील सदर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे गर्भवती महिलेला खासगी वाहनाने खासगी रुग्णालयात न्यावे लागले. त्यामुळे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत उपसरपंच पुनसे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Neglect in child labor at the Mangladevi Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.