बळीराजाच्या उपक्रमांकडे नेत्यांचे दुर्लक्ष
By admin | Published: March 19, 2017 01:32 AM2017-03-19T01:32:32+5:302017-03-19T01:32:32+5:30
बळीराजा चेतना अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमात कुठलेही वैयक्तिक निमंत्रण नसताना शेकडो नागरिक गोळा होतात.
पुसद : बळीराजा चेतना अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमात कुठलेही वैयक्तिक निमंत्रण नसताना शेकडो नागरिक गोळा होतात. दुसरीकडे नेत्यांना आमंत्रित करूनही ते उपस्थित राहात नाही. यावरून बळीराजा अभियानाच्या सामाजिक उपक्रमांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट होते.
शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्तेसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये म्हणून शासनस्तरावरून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. याच अनुषंगाने बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून सरकार आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला जात आहे. या उपक्रमात पथनाट्य, समाज प्रबोधन मेळावा, कृषी प्रदर्शन, जनजागृतीपर कार्यक्रम, वाचनालय निर्मिती, आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर, विविध शासकीय योजनांची माहिती, विधावा, निराधारांना योजनांचा लाभ देणे आदींसह विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. आतापर्यंत तालुक्यात अनेक गावात कार्यक्रम पार पडले. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कार्यक्रम घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे दिसून येते.
अधिकारी व लोकप्रतिनिधी प्रशासनाची दोन चाके आहेत. अधिकारी आपली जबाबदारी पार पाडत असताना लोकप्रतिनिधींमध्ये उत्साह दिसून येत नाही. (तालुका प्रतिनिधी)