विकास कामांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष
By admin | Published: September 4, 2016 12:57 AM2016-09-04T00:57:05+5:302016-09-04T00:57:05+5:30
नगरपरिषद हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या संत गजानन वॉर्ड तथा स्व.गुलाबसिंग रुडेनगर (जुना तांडा) येथील मूलभूत विकास कामांकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहे.
जुना तांडा : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार
उमरखेड : नगरपरिषद हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या संत गजानन वॉर्ड तथा स्व.गुलाबसिंग रुडेनगर (जुना तांडा) येथील मूलभूत विकास कामांकडे सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत तक्रार केली आहे.
नगरपरिषदेचे विद्यमान सत्ताधारी या भागाच्या विकासात अडथळा निर्माण करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच जातीने या भागाकडे लक्ष देण्याची मागणी गुलाबसिंग रुडेनगरच्या नागरिकांनी तक्रारीतून केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून नगरपरिषद हद्दवाढीत समाविष्ट करण्यात आलेल्या स्व.गुलाबसिंग रुडेनगरात सुमारे दोन हजार नागरिक राहतात. या वस्तीमध्ये अ, ब, क, ड नुसार विकास कामांसाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून रस्ते, नाली बांधकाम, पथदिवे व नळयोजना अशा मूलभूत सुविधा करणे आवश्यक होते. मात्र नगरपरिषद प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही या योजना राबविण्यात आल्या नाही.
नगरपरिषदेकडे विचारणा केली असता तुमच्या वस्तीच्या विकास कामांसाठी आम्हाला शासनाकडून एक रुपयाचाही निधी आला नाही, असे सांगून नागरिकांची बोळवण केली जात आहे. मूलभूत सुविधांपासून येथील नागरिक वंचित राहिले आहेत. त्यामुळे मागासलेल्या वस्तीचा विकास व्हावा आणि रहिवाशांना मूलभूत सोयी सुविधा प्राप्त व्हाव्या, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष देण्याची मागणी तांडावासीयांनी केली आहे.
(शहर प्रतिनिधी)