दगडातून देव साकारणारा समाज उपेक्षित

By admin | Published: November 18, 2015 02:46 AM2015-11-18T02:46:25+5:302015-11-18T02:46:25+5:30

मनगटाच्या जोरावर हातोडा अन् छन्नीच्या मदतीने काळ्याशार दगडावर घाव घालून देव साकारणारा पाथरवट समाज स्वतंत्र भारतातही उपेक्षित जीवन जगत आहे.

The neglected society is a neglected society | दगडातून देव साकारणारा समाज उपेक्षित

दगडातून देव साकारणारा समाज उपेक्षित

Next

हातात कला पण पोटात भूक : शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ नाही
शिवानंद लोहिया हिवरी
मनगटाच्या जोरावर हातोडा अन् छन्नीच्या मदतीने काळ्याशार दगडावर घाव घालून देव साकारणारा पाथरवट समाज स्वतंत्र भारतातही उपेक्षित जीवन जगत आहे.
या समाजातील बहुतांश कारागीर हे नाममात्र साक्षर आहेत. मात्र कोणत्याही विद्यापीठाची पदवी त्यांच्याकडे नाही. व्यावहारिकदृष्ट्या ते कोणत्याही नोकरीसाठी पात्र नसले तरी त्यांच्या हातात अंगभूत कौशल्य मात्र आहे. दगडाला आकार देवून देव साकारण्याची कला त्यांना अवगत आहे. त्यांनी साकारलेल्या देवाची घरोघरी पूजा केली जाते. मात्र तो देव साकारणाऱ्या हातांची मात्र उपेक्षा सुरू आहे. या कारागिरांच्या मूर्ती मूर्तिमंत कलेचा नमुना आहे. रानावनात धरणीमायच्या विशाल उदरात दडून बसलेल्या दगडाचा हे कारागिर शोध घेतात. आपल्या कलेद्वारे या दगडाचा देव करतात. या कलाकारांच्या घामातूनच या देवांना पहिला अभिषेक घडतो. या कारागिरांनीच साकारलेले देव श्रीमंत मंदिरांमध्ये विराजमान आहेत.
मात्र दगडाला देवपण देणाऱ्या समाजाची दैना सुरू आहे. पवनसूत मारुतीरायासह नंदी, पिंड, शंकर यासह नानाविध मूर्ती हे कारागीर घडवितात. घराघरातील स्वयंपाकघरात उपयोगी असलेली पारंपरिक जाते, पाटे, वरवंटे, खलबत्ता आदी वस्तूही हे कारागिर घडवतात. या वस्तूंच्या माध्यमातून नागरिकांच्या घरातील स्वयंपाक रुचकर बनतो. मात्र या वस्तू घडविणाऱ्या कारागिरांना दोन वेळच्या जेवणासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा जीवघेणा प्रवास पिढ्यान्पिढ्या असाच सुरू आहे. आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. अवघे जग माणसाच्या मुठीत सामावले आहे. परंतु या कारागिरांच्या कलेला अजूनही पर्याय नाही. तरीही त्यांच्या कलेची मात्र किमत केली जात नाही. आज या समाजाचा व्यवसाय संकटात सापडला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसभर राबराब राबून रक्त आटविणारे हे कारागिर इतरांच्या बंगल्याचा पाया मजबूत करतात. मात्र त्यांना स्वत:ला राहण्यासाठी निवारा नाही. शासनाने या कष्टकरी उपेक्षित समाजाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: The neglected society is a neglected society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.