अहाहा नेहा ! नीटमध्ये मिळविले ७२० पैकी ७२० गुण
By अविनाश साबापुरे | Published: June 5, 2024 04:39 PM2024-06-05T16:39:31+5:302024-06-05T16:42:12+5:30
ऑल इंडिया फस्ट रॅंक : खेड्यातल्या शिक्षकाची कन्या होणार डाॅक्टर
यवतमाळ : लोकसभेच्या एकेका फेरीचा निकाल हाती येत असतानाच मंगळवारी नीट परीक्षेचाही निकाल जाहीर झाला. अपार मेहनतीनंतरच यश देणाऱ्या या परीक्षेत एका साध्यासुध्या मुलीने चक्क ७२० पैकी ७२० गुण मिळवून संपूर्ण भारतात पहिली रॅंक पटकावली आहे. नेहा कुलदीप माने असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती बोरी या अगदीच छोट्याशा खेड्यातली रहिवासी आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) देशभरात ५ मे रोजी घेण्यात आली होती. देशासह परदेशातील २३ लाख ३३ हजार २९७ जणांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख १६ हजार २६८ विद्यार्थी नीटमध्ये उत्तीर्ण झालेत. मंगळवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीटचा निकाल जाहीर केला. त्यात नेहा कुलदीप माने या विद्यार्थिनीने पैकीच्या पैकी गुण मिळविले.
नेहा ही उमरखेड तालुक्यातील बोरी या गावची रहिवासी आहे. तिचे वडील कुलदीप माने हे बाजूच्याच चातारी गावातील शिवाजी विद्यालयात शिक्षक आहेत. तर आई उर्मिला गृहिणी आहेत. नेहाच्या यशाने माने कुटुंबीय आनंदाने गदगदून गेले आहे.
मोबाईल म्हणजे कामापुरता मामा !
गेल्या तीन वर्षांपासून नेहा नीटची झपाटून तयारी करीत होती. या काळात तिने टीव्ही पाहिलाच नाही. तर मोबाईलसाठी सकाळी १५ मिनिटे आणि सायंकाळी १५ मिनिटे एवढाच वेळ दिला. ‘मोबाईल म्हणजे कामापुरता मामा म्हणून वापरावा’ असे नेहा सांगते. नेहाची छोटी बहीण निधी सहाव्या वर्गात आहे. पण आपल्या ताईच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून तिनेही टीव्हीचा मोह सोडला अन् कादंबरी वाचनाचा छंद धरला.
समर्पित भावनेने केला अभ्यास
नीटची तयारी करताना नेहाने अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींना अजिबात स्थान दिले नाही. नीटमध्ये १०० टक्के गुण मिळविण्याचे तुझे तंत्र कोणते, असे विचारले असता नेहा म्हणते, ‘‘आपले बेसिक क्लिअर असले पाहिजे. मग पुढला अभ्यास कठीण जात नाही. रोजचा अभ्यास रोज आटोपलाच पाहिजे. आजच्या अभ्यासाला १५ तास हवे असतील तर १५ तास अभ्यास करावा. एखाद्या दिवशी आपला अभ्यास तीन तासात आटोपणारा असेल तर तीनच तास द्यावे.
नेहाने आपल्या स्टडी टेबलवर लिहून ठेवले होते, ‘मला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचेच आहेत.’ हा तिचा आत्मविश्वास तिने स्वत:च्या मेहनतीने सार्थ ठरविला. दिल्लीच्या एम्समध्ये ॲडमिशन हे तिचे ध्येय होते. तेही आता पूर्ण होईलच.
- कुलदीप माने, वडील
मुलांच्या मनावरील प्रेशर कमी करण्यात पालकांचाच मोठा वाटा असतो. माझे आई-बाबा माझ्याशी फार कनेक्ट आहेत. नीटच्या पेपरला जाताना मलाही थोडे टेन्शन जाणवलेच. तेव्हा बाबांनी माझा हात धरून सांगितले होते, ‘ही काही जीवनातली शेवटची परीक्षा नाही. तुला कमी गुण मिळाले तरी आम्ही तुझ्या सोबतच आहोत.’ त्यांच्या या शब्दांमुळेच मला जे शेवटचे दोन प्रश्न कठीण वाटले, तेही रिलॅक्स होऊन सोडवता आले.
- नेहा कुलदीप माने