नेरच्या व्यापाऱ्यांवर गुन्हा, जादा तूर विक्री भोवली
By admin | Published: May 28, 2017 12:42 AM2017-05-28T00:42:14+5:302017-05-28T00:42:14+5:30
शेतकऱ्यांच्या नावावर आपली तूर विकणाऱ्या येथील चार व्यापाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : शेतकऱ्यांच्या नावावर आपली तूर विकणाऱ्या येथील चार व्यापाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहकार विभागाच्या या कारवाईने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
नाफेडच्या तूर खरेदीत घोटाळा झाल्याचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेली तूर अत्यंत कमी दरात व्यापाऱ्यांनी खरेदी केली. तीच तूर शासकीय हमी दराने शासकीय केंद्रांवर विकली. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर अनेक व्यापाऱ्यांनी आपली तूर शासकीय केंद्रांवर विकल्याचे उघडकीस आले. यातून व्यापाऱ्यांनी शासनाची व शेतकऱ्यांचीही फसवणूक केली. जादा पैसा लाटून व्यापारी गब्बर झाले. याप्रकरणी येथील युवा संघर्ष समितीने तक्रार केली होती.
प्राप्त तक्रारीवरून सहकार विभागाने नेर येथील खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या तुरीची चौकशी केली. यात शेतकऱ्यांची तूर कमी दरात घेऊन व्यापाऱ्यांनी तीच तूर शासकीय केंद्राला विकल्याचे उघड झाले. याप्रकरणात येथील १६ व्यापारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले. त्यापैकी चार प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर झाला. त्यात सूरज लुणावत, किरण लुणावत, सुभाष लुणावत आणि किशोर लुंकड हे चार व्यापारी दोषी आढळल्याने सहायक निबंधक गोपाल कुमरे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध भादंवि ४२० कलमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
यापूर्वी चार व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली. उर्वरित व्यापाऱ्यांची चौकशी सुरू असून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू.
- रवींद्र राऊत
सभापती, बाजार समिती, नेर