मृतदेहासह नेर पोलीस ठाण्यावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 09:12 PM2019-01-03T21:12:57+5:302019-01-03T21:13:30+5:30
तालुक्यातील पांढरी येथे विनयभंगाच्या वादातून युवकावर दोघांनी चाकू हल्ला केला. या युवकाचा उपचारादरम्यान गुरुवारी यवतमाळात मृत्यू झाला. त्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी चाकूहल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी मृतदेह घेऊन दुपारी नेर ठाण्यासमोर आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील पांढरी येथे विनयभंगाच्या वादातून युवकावर दोघांनी चाकू हल्ला केला. या युवकाचा उपचारादरम्यान गुरुवारी यवतमाळात मृत्यू झाला. त्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी चाकूहल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी मृतदेह घेऊन दुपारी नेर ठाण्यासमोर आंदोलन केले. काही तासानंतर ठोस आश्वासन मिळाल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले.
महेश भिवाजी तायडे (२३) रा. शिरसगाव पांढरी असे मृताचे नाव आहे. ३० डिसेंबरला सायंकाळी विनयभंग केल्याच्या कारणावरून आरोपी अजय डबले (२२), पियूष डबले (२०) व त्यांच्या मित्रांनी सर्व रा. अंबिकानगर यवतमाळ यांनी महेशवर चाकूहल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेर पोलिसांनी चाकूहल्ला करणाºयांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र पाच दिवसांपासून अटकेची कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, महेशचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या तायडे कुटुंबीयांनी थेट नेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महेशच्या खुनातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.
तायडे कुटुंबीयांची पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते जुमानत नव्हते. शेवटी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या स्वीय सहायकाने मध्यस्थी केल्यानंतर वाद निवळला. तायडे कुटुुंबीयांनी महेशवर अंत्यसंस्कार करण्याचे मान्य केले. तणाव निर्माण झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे घटनास्थळी दाखल झाले. ठाणेदार अनिल किनगे यांनी पांढरी येथे चोख पोलीस बंदोबस्त लावला.
बंदोबस्तातच महेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर भिवाजी तायडे यांच्या तक्रारीवरून अष्टशिला डबले, भानूदास धवने, अवधुत डबले, महोदव धवने यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.