नेर एसटी आगाराचे वेळापत्रक कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:50 PM2018-11-14T23:50:19+5:302018-11-14T23:50:46+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नेर आगारात वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. रात्री ८ वाजताची बस चक्क एक वाजता लावण्याचा प्रतापही या आगाराने केला आहे. अवेळी सुटणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नेर आगारात वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. रात्री ८ वाजताची बस चक्क एक वाजता लावण्याचा प्रतापही या आगाराने केला आहे. अवेळी सुटणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विभागीय नियंत्रकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
मागील महिनाभरापासून या आगाराचा कारभार ढेपाळला आहे. आगार व्यवस्थापक नसल्याने संपूर्ण शेड्यूल बिघडले आहे. चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नाही. बसेसचे ठरलेले वेळापत्रक कोलमडले आहे. संपूर्ण दिवसभरातील फेऱ्या कमीअधिक फरकाने उशिरा जात आहेत. काही दिवसांपूर्वी तर बसफेरी उशिरा सोडण्याचा विक्रमच या आगाराने केला आहे. नेर-वाढोणा ही मुक्कामी बस रात्री ८ वाजता येथून सुटते. यादिवशी चक्क रात्री एक वाजता ही फेरी येथून रवाना झाली. तोपर्यंत अनेक प्रवासी याठिकाणी ताटकळत होते.
सावरगाव(काळे), वाढोणा, बाभूळगाव, दारव्हा आदी गावच्या मुक्कामी बसेस बहुतांशवेळा खूप उशिराने सोडल्या जातात. बसेस प्लॅटफार्मवर लावल्या जात नाहीत. अनेकवेळा तर फलक लावण्याचेही टाळले जाते. बसस्थानकात थांबून असलेल्या प्रवाशांना उठून जाऊन चालक वा वाहकाकडे ‘ही बस कुठे जात आहे’ याची विचारणा करावी लागते. अनेकदा तर प्रवाशांवर खेकसण्याचेही प्रकार घडतात. याठिकाणी आगार व्यवस्थापक दिल्यास कोलमडलेले वेळापत्रक नियंत्रणात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बसफेरी रद्द व्हावी म्हणून असाही प्रयोग
नियमित वेळेपेक्षा उशिरा बसेस सोडण्यामागील कारण भंडावून सोडणारे आहे. मुक्कामी बस रद्द व्हावी यासाठी चालक-वाहकांकडून असा प्रयोग केला जात असल्याचे सांगितले जाते. बसला उशीर होत असल्यास अनेक प्रवासी मिळेल त्या साधनाने निघून जातात. अशावेळी बसला प्रवासी मिळत नाही. हीच संधी पाहून फेरी रद्द केली जाते, असे सांगितले जाते.