नेर बायपासचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 09:46 PM2019-03-14T21:46:14+5:302019-03-14T21:46:52+5:30
अनेक वर्षांपासून नेर ग्रामस्थांचा बायपाससाठी संघर्ष सुरू आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या बायपासचे काम सुरू होणार, अशा वावड्या उठविण्यात आल्या. काम सुरू झाल्याचा देखावाही निर्माण झाला. प्रत्यक्ष मात्र बायपासकरिता लागणारी जमीन संपादनाची प्रक्रियाच अर्धवट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : अनेक वर्षांपासून नेर ग्रामस्थांचा बायपाससाठी संघर्ष सुरू आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर या बायपासचे काम सुरू होणार, अशा वावड्या उठविण्यात आल्या. काम सुरू झाल्याचा देखावाही निर्माण झाला. प्रत्यक्ष मात्र बायपासकरिता लागणारी जमीन संपादनाची प्रक्रियाच अर्धवट आहे. यामुळे नेर बायपासचे काम पुन्हा रखडले आहे.
प्रशासकीय मान्यता होऊन पाच वर्षे लोटली. त्यानंतरही बायपासच्या भूसंपादन व रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. या बायपासला वनविभागानेही परवानगी दिली नाही. शिवाय नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून हा बायपास जात आहे. त्या शेतकऱ्यांनीही राजीनामा दिलेला नाही. बायपाससाठी लागणाºया जागेच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्यास्तरावरही याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा बायपासचे काम रखडणार काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्याच्या सर्वेत बदल करण्याचा प्रस्ताव आहे. शासनाने गेल्या पाच वर्षात हे काम संथ गतीने केले. बायपासच्या मुद्यावर राजकीय नेत्यांनी प्रत्येकवेळी आपली पोळी शेकली आहे. रस्त्याचे काम रखडल्याने लाखो रुपयांचा भुर्दंड शासनावरच बसत आहे. गरज नसताना बायपाससाठी अनेक ठिकाणी जागांची खरेदी करण्यात आली आहे. अमरावती-यवतमाळ या राज्य मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. नेर शहरातूनच हा मार्ग जात असल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी होत राहते. येथील अपघातात अनेकांचे बळी गेले आहे. बायपाससाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन, मोर्चे काढले. निवेदने दिली. तरीही या बायपासच्या कामाबाबत यंत्रणा गंभीर दिसत नाही.
बायपाससाठी नऊ शेतकरी जागा देण्यास तयार नाही. भूसंपादनाच्या मंजूरीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ज्या जागा खरेदी झाल्या आहे त्यांचा ताबा घेण्यासाठी काम सुरू आहे.
- भूपेश कथलकर,
बांधकाम अभियंता, नेर