नेर तालुक्याची आरोग्यसेवा कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:46 PM2019-08-05T23:46:05+5:302019-08-05T23:46:42+5:30
जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यंत्रणेच्या बाबतीत कुपोषित आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाºयांचा कामचुकारपणा यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय या तालुक्याला औषध तुटवड्याच्याही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यंत्रणेच्या बाबतीत कुपोषित आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाºयांचा कामचुकारपणा यामुळे नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय या तालुक्याला औषध तुटवड्याच्याही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
तालुक्यात १७ आरोग्य उपकेंद्र आहेत. यातील पाच ठिकाणी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कर्मचारी नाहीत. रिक्त जागांमुळे हे उपकेंद्र शोभेची वास्तू ठरले आहे. मोझर, सातेफळ, खरडगाव, कोव्हळा, चिकणी, उमरठा, मालखेड(बु), वीरगव्हाण, बाणगाव आदी गावांसाठी आरोग्यसेवक कार्यरत आहेत. मात्र त्यांचे दर्शन लोकांना होत नाही.
ग्रामीण भागात जलजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होत आहे. याविषयी लोकांमध्ये जनजागृती आणि उपाययोजनांची जबाबदारी प्राथमिकस्तरावर आरोग्यसेवकांची आहे. दूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्याचे सौजन्य त्यांच्याकडून दाखविले जात नाही. शिरसगाव, पाथ्रड(गोळे), पिंपळगाव, दहीफळ, बोरगाव, मांगलादेवी, नेर नबाबपूर या गावासाठी तर आरोग्यसेवकच नाही.
तालुक्याला आरोग्यसेवा पुरविणाºया केंद्रांमध्ये औषधसाठा पुरविला जातो. मात्र प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचत नाही. ही औषधी नेमकी जाते कुठे याचा शोध घेण्याची गरज आहे. तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याची नागरिकांची ओरड आहे. आरोग्य विभागाच्या विविध योजनाही प्रभावीपणे राबविल्या जात नाही.
जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
नेर तालुक्याची आरोग्य यंत्रणा आजारी आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा, औषधांची लावली जात असलेली विल्हेवाट. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. याविषयी काही जागरूक नागरिकांकडून अनेकदा तक्रारी झाल्या. मात्र याकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढत चालले आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने या विषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.