नेरमध्ये कडकडीत बंद
By admin | Published: December 24, 2015 03:08 AM2015-12-24T03:08:09+5:302015-12-24T03:08:09+5:30
प्रस्तावित पुसद जिल्हा निर्मितीमध्ये नेर व दारव्हा तालुक्यांचा समावेश होत असल्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ....
तहसीलवर मोर्चा : पुसद जिल्ह्यात नेरचा समावेश करण्यास विरोध
नेर : प्रस्तावित पुसद जिल्हा निर्मितीमध्ये नेर व दारव्हा तालुक्यांचा समावेश होत असल्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नेर तालुक्याचा पुसद जिल्ह्यात समावेश स्वीकारण्यात येवू नये, या मागणीसाठी शहरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
प्रस्तावित पुसद जिल्ह्यामध्ये नेर व दारव्हा तालुका समाविष्ट करण्याच्या प्रशासनाच्या छुप्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. प्रशासनाने नेर तालुक्याचा कोणताही भौगोलिक अभ्यास न करता घेतलेल्या या निर्णयाचा नागरिकांमधून विरोध होत आहे. सर्वसामान्य नेर व दारव्हा तालुक्यातील नागरिकांच्यादृष्टीने हा निर्णय अतिशय गैरसोयीचा आहे. नेर शहर संघर्ष समितीच्यावतीने या बाबीचा निषेध करण्यात येवून स्वयंस्फूर्तीने बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. शहरातील मुख्य बाजार ओळीतून निषेध मोर्चा काढण्यात येवून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. त्याठिकाणी जाहीर सभा घेण्यात आली. या मोर्चात शहरातील सर्व लहान-मोठे प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. आजच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे संघर्ष समितीच्यावतीने सांगण्यात आले आहे. नेर व्यापारी असोसिएशन, तालुका वकील संघ, फोटोग्राफर संघटना, पत्रकार संघटना आदी या बंदमध्ये सहभागी झाले होते. सभेनंतर तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यामध्ये संभाव्य पुसद जिल्हा हा नेर व दारव्हा तालुक्यातील नागरिकांसाठी गैरसोयीचा ठरणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबतचा खात्रीलायक खुलासा करावा आणि नेर व दारव्हा तालुक्यांना यवतमाळ जिल्ह्यातच कायम ठेवावे, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी संतोष अरसोड, पुरुषोत्तम लाहोटी, नितीन माकोडे, गणेश राऊत, साजीद सेठ, अश्विन दावडा, गजानन काळे, प्रवीण पाटमासे, प्रदीप आडे, नाना घोंगडे, गौरव नाईकर, सोनू ठाकरे, पंजाबराव शिरभाते, अशोक खंडरे, रूपेश गुल्हाने, अजिंक्य येळणे, अजिंक्य काडगळे, विकास जामनकर, नितीन कराळे, सचिन कराळे, मोहन पापळकर, समीर तोटे, बाळू चिद्दरवार, किशोर पासुळकर, गुंजन दारव्हटकर, सागर गुल्हाने आदींसह असंख्य नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)