नेरच्या युनियन बँकेचा दलाल ‘सीबीआय’च्या जाळ्यात

By admin | Published: September 17, 2016 02:45 AM2016-09-17T02:45:27+5:302016-09-17T02:45:27+5:30

कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्या येथील युनियन बँकेच्या दलालास सीबीआयने अटक केली.

Ner's union bank broker 'CBI' trap | नेरच्या युनियन बँकेचा दलाल ‘सीबीआय’च्या जाळ्यात

नेरच्या युनियन बँकेचा दलाल ‘सीबीआय’च्या जाळ्यात

Next

नेर : कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्या येथील युनियन बँकेच्या दलालास सीबीआयने अटक केली. गुरूवारी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. सोबतच बँकेची तब्बल सहा तास गोपनीय चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे सदर बँकेचे अधिकारी आणि कर्मचारीही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील कवठा येथील उमेश कुकडे यांची नेर तालुक्यात चार एकर शेती आहे. ६० हजार रुपये पीक कर्जासाठी त्यांनी युनियन बँकेच्या येथील शाखेकडे अर्ज केला. बरेच दिवस लोटूनही कर्ज मंजूर झाले नाही. दरम्यान, या बँकेचा बिजीनेस कॅसीलेटर (दलाल) तथा ग्रामपंचायत सदस्य असलेला विश्वंभर जांभूळकर रा. वटफळा याने या शेतकऱ्याला गाठले. कर्ज मंजुरीसाठी त्याने पाच हजार रुपयांची लाच मागितली.
या प्रकाराची तक्रार शेतकरी उमेश कुकडे यांनी सीबीआयच्या नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. १४ सप्टेंबरला या पथकाने गोपनीय पद्घतीने खातरजमा केली.
पुढील कारवाईच्या दृष्टीने शेतकऱ्याशी चर्चा केली. ठरल्यानुसार गुरूवार १५ सप्टेंबर रोजी दलाल विश्वंभर जांभुळकर याला बँकेच्या खाली बोलाविले. तीन हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले.
चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या वटफळा येथील घरातील दस्तावेजाची तपासणी केली. शिवाय बँकेचीही सहा तास चौकशी करण्यात आली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी केली. सदर प्रकारात आणखी कोणाचा समावेश आहे, हे चौकशीत पुढे येणार आहे. काही वर्षांपूर्वी याच बँकेच्या मांगलादेवी शाखेतील व्यवस्थापकाला सीबीआयच्या पथकाने लाच स्वीकारताना पकडले होते. ही संपूर्ण कारवाई सीबीआयचे सहायक पोलीस आयुक्त लांबाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. राष्ट्रीयकृत बँकेत कुणी दलाल, कर्मचारी लाच मागत असेल तर थेट तक्रार करा, असे आवाहन लांबाडे यांनी यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Ner's union bank broker 'CBI' trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.