जिल्ह्यात तीन हजार कोटींच्या रस्त्यांचे जाळे

By admin | Published: November 20, 2015 02:51 AM2015-11-20T02:51:44+5:302015-11-20T02:51:44+5:30

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह जिल्हा मार्गावरच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

The network of roads of three thousand crores in the district | जिल्ह्यात तीन हजार कोटींच्या रस्त्यांचे जाळे

जिल्ह्यात तीन हजार कोटींच्या रस्त्यांचे जाळे

Next

७६८ किमी : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची मंजुरी, २५ नोव्हेंबरला भूमिपूजन
यवतमाळ : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासह जिल्हा मार्गावरच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यासाठी दोन हजार ८७३ कोटी १५ लाख रुपये मंजूर झाले आहे. यातून ७६८ किलोमीटर रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहे. जिल्ह्याला प्रथमच केंद्राकडून रस्ते निर्मितीसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. या कामाची कोनशीला केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २५ नोव्हेंबर रोजी ठेवली जाणार आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्यावतीने या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यातून यवतमाळ शहरातील आर्णी मार्गाच्या चौपदरीकरणासह ग्रामीण भागातीलही विविध पूल आणि अंतर्गत रस्ते तयार केले जाणार आहे. यवतमाळातील बसस्थानक चौक ते वनवासी मारोती मंदिर चौकापर्यंत दहा कोटी रुपयांचा चौपदरी रस्ता केला जाणार आहे. हा रस्ता सिमेंट क्राँकीटचा होणार असून त्यासाठी ६० कोटींची तरतूद आहे. याशिवाय शारदा चौकातून अडीच किलोमीटर लांबीचा दहा कोटींचा बायपासही करण्यात येणार आहे. नवीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दिग्रस, दारव्हा, कारंजा या ७० किमीच्या रस्त्यावर ७०० कोटी, करंजी मोहदा, जोडमोहा, यवतमाळ, नेर, अमरावती या १८० किलोमीटरच्या रस्त्यासाठी १८०० कोटींची तरतूद आहे. कळंब, राळेगाव, कापसी, सिरसगाव, वडनेर हा ६५ किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासाठी ६५० कोटींची तरतूद आहे. केळापूर विधानसभा क्षेत्रातील पारवा, पिंपळखुटी, बोरी, पाटण या रस्त्यासाठी २० कोटी आहे. त्यानंतर सोनबर्डी, साखरा, पांढरकवडा, शिबला ते झरी या रस्त्यासाठी १३ कोटी मंजूर केले आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांंच्या मतदारसंघात धावंडा नदीवर आठ कोटींचा पूल उभारण्यात येणार आहे. फुबगाव, नखेगाव, तरणोळी, लोणी या दारव्हा तालुक्यातील २५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी चार कोटी मंजूर केले आहे. आर्णी-नेताजीनगर-सावंगा-चिकटा-सावंगा रोड या २६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी नऊ कोटी २५ लाखांची तरतूद केली आहे. मंगरुळपीर-दारव्हा-जवळा- अकोलाबाजार या रस्त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद आहे. राळेगाव मतदारसंघात नेर-पहूर-बाभूळगाव - कळंब या रस्त्यासाठी आठ कोटींची तरतूद केली आहे. कळंब-राळेगाव-वडकी हा रस्ता पांढरकवडा मार्गाशी जोडला जाणार आहे.
त्यावर दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. शिंगणापूर-पुरगाव-दाभा-पहूर-बाभूळगाव-कळंंब या २५ किलोमीटरच्या रस्त्यावर दोन कोटींचा खर्च मंजूर केला आहे. यवतमाळ विधानसभा धामणगाव-यवतमाळ- अकोलाबाजार या मार्गावर ४९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. कोळंबी-घाटंजी मार्गावर १४ कोटी ३३ लाख खर्च होणार आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर या चौपदरी मार्गाच्या कामावर ४५ कोटी ७६ लाखांंची तरतूद यवतमाळ विधानसभा क्षेत्रात केली आहे.
खासदार भावना गवळी यांच्याकडून सूचविण्यात आलेल्या पुसद-गुंज-महागाव या दहा कोटींच्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. वाशिम-पुसद-गुंज यावरही दहा कोटींची तरतूद आहे. या सर्व रस्त्यांच्या कामाचे प्रातिनिधीक भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार विजय दर्डा, खासदार भावना गवळी, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, पालकमंत्री संजय राठोड, आमदार मनोहरराव नाईक, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार ख्वाजा बेग, आमदार संदीप बाजोरिया, आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, नगराध्यक्ष सुभाष राय आदी उपस्थित राहणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The network of roads of three thousand crores in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.