यवतमाळच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:47 AM2018-03-26T11:47:16+5:302018-03-26T11:47:25+5:30
युरोप, आफ्रिका, आशिया खंडात आढळणारा ‘चिलडोनिअस ल्युकोपटेरेस’ हा देखणा पक्षी रविवारी यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा धरणावर प्रथमच आढळला. त्यामुळे जिल्ह्याच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाल्याचा आनंद पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : युरोप, आफ्रिका, आशिया खंडात आढळणारा ‘चिलडोनिअस ल्युकोपटेरेस’ हा देखणा पक्षी रविवारी यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा धरणावर प्रथमच आढळला. त्यामुळे जिल्ह्याच्या पक्षीसूचीत नव्या पाहुण्याची नोंद झाल्याचा आनंद पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केला.
इंग्रजीत व्हाईट विंग टर्न अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पक्ष्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रंगरचनेवरून त्याला पांढऱ्या पंखाचा काळा सूरय असेही म्हटले जाते. अमोलकचंद महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी व सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दीपक दाभेरे यांना पक्षीनिरीक्षणादरम्यान हा देखणा पक्षी बेंबळा धरणावर आढळला. भारतात शीतऋतूदरम्यान गुजरात व तमीळनाडूचा समुद्रकिनारा वगळता क्वचितच तो स्थलांतरादरम्यान दिसण्याची शक्यता असते.
रविवारी आढळलेला हा सूरय आपल्या प्रजनन पिसारा अपूर्ण अवस्थेत असतानाचा आहे. त्यामुळे आम्हाला त्याला ओळखणे शक्य झाले, असे डॉ. जोशी म्हणाले. हा स्थलांतराचा महिना आहे. त्यामुळे मायदेशी परतणारे असंख्य पक्षी यवतमाळच्या मार्गाने जात असताना कोणत्याही पाणवठ्यावर उतरले तर त्यांची नोंद घेण्यासाठी आम्ही सज्ज आहो, असे डॉ. दाभेरे यांनी सांगितले.