भूमाफियांविरोधात नव्या तक्रारींची एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 09:49 PM2018-07-20T21:49:47+5:302018-07-20T21:52:33+5:30
शहरातील भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तक्रारींचा ओघ वाढतो आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील भूखंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तक्रारींचा ओघ वाढतो आहे. सध्याच संदीप टॉकीज परिसर व धामणगाव रोड या भागातून तक्रारी आल्या असून पोलिसांना आणखी नव्या तक्रारींची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जाते.
यवतमाळातील कोट्यवधींचा भूखंड घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची १७ सदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात आली. एसआयटीचे काम सध्या शहर पोलीस ठाण्यात दाखल एकाच गुन्ह्यावर केंद्रीत आहे. मात्र आणखी दोन गुन्हे लगेच दाखल होऊ शकतात. त्यातील तक्रारदारांनी पोलिसांची भेट घेतली. त्यांना संबंधित संपूर्ण कागदपत्रांसह तक्रार देण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. असे आणखी अनेक तक्रारदार दोन आठवड्यात पुढे येण्याची शक्यता आहे. एसआयटी स्थापन झाल्यानंतर धाबे दणाणलेल्या भूमाफियांनी तक्रारी होऊ नये यासाठी हालचाली चालविल्या आहे. कुणी पैसे परत देण्याची तयारी चालविली आहे, कुणी पुढच्या तारखेचे धनादेश दिले तर कुणी गुंडांना हाताशी धरुन दम देण्याचे प्रकार केल्याचेही बोलले जाते. तक्रारदार एसआयटीकडे जाऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनाही तक्रारींची प्रतीक्षा आहे. त्या न आल्यास एखादवेळी पोलीस स्वत:हून पुढाकार घेऊन या व्यवहारातील कर्ज देणाऱ्या बँकांना नोटीस बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भूखंड घोटाळ्याशी संबंधित राकेश, मंगेश यांची अनेक प्रकरणे चर्चेत येऊ लागली आहे. राकेश हा गावातच फिरत असल्याचे कुणी सांगतो आहे तर कुणी विदेशात असल्याची माहिती देतो आहे. मंगेश याची चेक बाऊंसची अनेक प्रकरणे आहेत. एकट्या यवतमाळ शहर ठाण्यातच चेक बाऊंसच्या आठ ते नऊ प्रकरणात त्याचे समन्स-वॉरंट असल्याची माहिती आहे. वर्धेतील एका इनोव्हा गाडीच्या खरेदी प्रकरणातही येथील आॅटोडिल व्यावसायिकाला एक लाख ६० हजारांचा चुना लागला आहे. त्यांना दिलेले दोन्ही चेक बाऊंस झाले. या प्रकरणातसुद्धा मंगेशचे नाव जोडले जात आहे.
चेक बाऊन्सची समन्स-वॉरंट तामिली थंडबस्त्यात
चेक बाऊन्सची प्रकरणे न्यायालयात गेल्यानंतर तेथून संबंधितांच्या नावे समन्स-वॉरंट जारी होतो. तो तामिल (अंमलबजावणी) करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाण्याच्या त्यासाठी नेमलेल्या कर्मचाºयांवर असते. त्यावर ठाणेदारांचे नियंत्रण असते. परंतु बहुतांश वेळा पोलीस कर्मचारी हितसंबंधामुळे ‘मिळून आला नाही’ एवढा शेरा लिहून हे समन्स-वॉरंट परत पाठवितात. त्यांना जणू न्यायालयांचीही भीती उरलेली नाही, असेच यावरून दिसते. समन्स-वॉरंटची प्रामाणिकपणे अंमलबजावणी न करण्यामागे आर्थिक हितसंबंधसोबतच राजकीय दबाव, लागेबांधेसुद्धा तेवढेच महत्वाचे ठरतात. याच हितसंबंधातून आजच्या घडीला यवतमाळ शहरच नव्हे तर अनेक पोलीस ठाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चेक बाऊन्स प्रकरणात अनेक महिन्यांपासून समन्स-वॉरंट प्रलंबित असल्याची माहिती आहे.
एसपींनी आढावा घ्यावा
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्याचा आढावा घेतल्यास वास्तव उघड होईल. वेळेत समन्स-वॉरंट तामिल होत नसल्याने न्यायालयात वर्षानुवर्षे खटले प्रलंबित राहतात. हा आकडा वाढतच असल्याने न्यायालयांच्या कर्तव्यदक्षतेवर जनतेतून प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. त्यात न्यायव्यवस्थेची प्रतिमा डागाळते. अनेकदा पोलिसांकडून समन्स-वॉरंटची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होत नसल्याबाबत खुद्द न्यायालयांनीसुद्धा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. पैरवी अधिकारी नेमल्यानंतर हे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी राजकीय दबाव व हितसंबंधामुळे अजूनही चेक बाऊन्सच्या अनेक प्रकरणातील समन्स-वॉरंट ‘प्रामाणिकपणे’ न्यायालयाला ठरलेला शेरा लिहून परत पाठविली जात आहे.
‘लोकमत’कडेही तक्रारींचा ओघ
‘लोकमत’ने भूखंड घोटाळा उघडकीस आणल्यानंतर राकेश, मंगेश, शिवा च नव्हे तर अनेकांनी स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात फसवणूक केल्याची आपबिती कथन करण्यासाठी ‘लोकमत’ कार्यालय गाठले. त्यांनी आपली कागदपत्रेही दाखविली. यापूर्वी पोलीस व महसूल प्रशासनाकडे तक्रारी करुनही न्याय मिळाला नसल्याचे सांगितले. या सर्व तक्रारदारांना संपूर्ण कागदपत्रांनिशी एसआयटीकडे आपले म्हणणे मांडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयाची यंत्रणा ‘रडार’वर
नोंदणी व मुद्रांक उपमहानिरीक्षक मोहन जोशी यांनी गेल्या सात वर्षातील खरेदी-विक्री व्यवहाराची तपासणी सुरू केल्याने यवतमाळच्या दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयाची यंत्रणा कारवाईत अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अर्जनविसाच्या आडोश्याने गुंड-माफियांची दलाली करणाºया युवकाचा चेंबरमधील ठिय्या सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.