शिवसेनेत नवे जिल्हा प्रमुख
By admin | Published: July 4, 2015 02:46 AM2015-07-04T02:46:00+5:302015-07-04T02:46:00+5:30
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळात शिवसेनेला नवे जिल्हा प्रमुख मिळणार आहेत. आठवडाभरात या नव्या शिलेदारांची घोषणा मुंबईतून केली जाईल.
आठवडाभरात घोषणा : माजी आमदारांसह अनेकांची मोर्चेबांधणी
राजेश निस्ताने यवतमाळ
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यवतमाळात शिवसेनेला नवे जिल्हा प्रमुख मिळणार आहेत. आठवडाभरात या नव्या शिलेदारांची घोषणा मुंबईतून केली जाईल. दरम्यान जिल्हा प्रमुख पदी वर्णी लावून घेण्यासाठी माजी आमदारांसह अनेकांनी फिल्डींग लावली असून काहींनी तर थेट ‘मातोश्री’पर्यंत धाव घेतली आहे.
संजय राठोड गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत. जिल्हा प्रमुख असतानाच आमदार म्हणून ते निवडून आले. त्यानंतरही अनेक वर्ष त्यांनी जिल्हा प्रमुख व आमदारकी या दोनही जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. मात्र आता त्यांची राज्यमंत्री मंडळात वर्णी लागली. एकावेळी जिल्हा प्रमुख, आमदार, राज्यमंत्री अशा तीन जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना कसरत करावी लागते. तीनही पदांना एकावेळी न्याय देणे शक्य होत नाही. म्हणून यवतमाळला नवे जिल्हा प्रमुख देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. त्या अनुषंगाने शिवसेनेचे संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर (मुंबई) यांनी नुकतीच येथे दोन दिवसीय मॅराथॉन बैठक घेतली. त्यात यवतमाळ शहरातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली गेली. उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांना स्वतंत्र वेळ दिला गेला.
जिल्हाभरातील शाखा प्रमुखांना पहिल्यांदाच चर्चेत सामावून घेतले गेले. या त्रि-स्तरीय बैठकीतून जिल्ह्यातील शिवसेनेच्या सद्यस्थितीचा नेरुरकर यांनी अभ्यास केला. या अभ्यासातूनच आता जिल्ह्याला नवे नेतृत्व मिळणार आहे.
जिल्हा प्रमुखपदी वर्णी लावून घेण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. कुणी उघड तर कुणी छुपी फिल्डींग लावून आहेत एवढेच ! शहरातील अनेक पदाधिकारी जिल्हा प्रमुख होण्याची मनिषा बाळगून आहेत. मात्र उघडपणे रिंगणात उतरून स्थानिक श्रेष्ठींशी वाईटपण घेण्याची त्यांची तयारी नाही. एक-दोन पदाधिकाऱ्यांनी तर थेट ‘मातोश्री’पर्यंत मोर्चेबांधणी केली. खासदार अनिल देसाई यांच्यामार्फत थेट उद्धव ठाकरेंपर्यंत भावना पोहोचविण्याचा प्रयत्न झाला. मात्र आपले म्हणणे संपर्क प्रमुखामार्फत पाठवा, असे म्हणून या इच्छुकांना विश्वनाथ नेरुरकरांच्या दरबारात परत पाठविले गेले.
शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवा जिल्हा प्रमुख हा राज्यमंत्री संजय राठोड यांच्याच मर्जीतील कुणी तरी होईल, असा राजकीय अंदाज आहे. मात्र संपर्क प्रमुख बदलल्याने यावेळी वेगळा निकाल पहायला मिळेल, असा विश्वास निष्ठावंत शिवसैनिक व्यक्त करीत आहे. जिल्हा प्रमुख पदासाठी वणीचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जाते. नांदेकर यांना नियुक्ती देऊन बाळासाहेब मुनगीनवार यांना जिल्हा प्रमुख पदावर कायम ठेवले जाण्याची शक्यताही शिवसेनेच्या गोटात वर्तविली जात आहे.
केंद्रिय मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या खासदार भावना गवळी यांचा जिल्ह्यात स्वतंत्र असा कोणताही गट नाही. मात्र त्या आपले वजन कुणाच्या पारड्यात टाकतात हे पाहणेही तेवठेच महत्वाचे ठरते. संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर यांच्या कार्यशैलीवर सामान्य शिवसैनिक खूश आहेत. त्यामुळेच यावेळी निष्ठावंत व सामान्य कार्यकर्त्यांपैकीच एखाद्याच्या गळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची माळ घातली जाईल, असा विश्वास शिवसैनिकांना वाटतो आहे.