नवे शैक्षणिक धाेरण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 10:36 AM2024-08-11T10:36:50+5:302024-08-11T10:53:08+5:30

जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात साधला प्राध्यापकांशी संवाद

New educational approach to guide students lives said Minister Chandrakant Patil | नवे शैक्षणिक धाेरण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नवे शैक्षणिक धाेरण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: व्यवसायाभिमुख शिक्षण हा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे. त्यामुळे या धोरणाची सर्वस्तरावर अंमलबजावणी झाल्यास बेरोजगारांचे लोंढे थांबतील. या शिक्षणातून स्वयंरोजगारक्षम युवा पिढी घडेल, नवनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करत नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शुक्रवारी त्यांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा होते.  प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी उद्योग व शालेय शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. रामचंद्र तत्त्ववादी यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हे शैक्षणिक धोरण पूर्ण क्षमतेने राबविले जात आहे. नवे शैक्षणिक धोरण रोजगार निर्माण करणाऱ्या शिक्षणाचा आग्रह धरते. अगदी कला शाखेच्या विद्यार्थ्यानेही प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावे, व्यवसायाभिमुख व्हावे, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, असा आग्रह आहे, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत देशात महाराष्ट्र पहिले असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य रामचंद्र तत्त्ववादी यांनी तर किशोर दर्डा यांनी आभार मानले.

मागास, आदिवासीबहुल जिल्ह्यात शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास : डॉ. दर्डा

डॉ. विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या स्थापनेमागील भूमिका विशद केली. यवतमाळमध्ये ज्या शैक्षणिक संस्थांंची उभारणी झाली, त्या संस्था नागपूर, पुण्या-मुंबईतही आम्हाला उभारता आल्या असत्या. मात्र, श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांनी मागास असलेल्या यवतमाळमध्ये दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्था उभारल्या. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हीच या मागची भूमिका असल्याचे सांगत प्रत्येक गोष्टीत पैसा नव्हे तर आम्ही गुणवत्ता पाहतो, यवतमाळमधील या संस्था आज गुणवत्तेतही अग्रेसर असून, या महाविद्यालयांतून शिकलेले विद्यार्थी विविध देशांत उच्च पदांवर कार्यरत असल्याचे डॉ. दर्डा यांनी सांगितले.

राजेंद्र दर्डा यांच्या कार्यपद्धतीचे केले कौतुक

मधुकरराव चौधरी यांनी शिक्षणमंत्री म्हणून कारकीर्द गाजविली होती. त्यांनी या विभागाला खऱ्या अर्थाने शिस्त लावली. त्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी राज्यातील शिक्षण विभागात आमूलाग्र बदल केले. कायम विनाअनुदानितचा मुद्दा राज्यात जटील झाला होता, गाजत होता. यातील ‘कायम’ हा शब्द काढण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. या निर्णयामुळे राज्यातील ४,२०० शाळांतील हजारो शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगत राजेंद्र दर्डा यांच्या कार्याचे कौतुक केले.

Web Title: New educational approach to guide students lives said Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.