साहित्य संमेलनातून नवीन ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:20 PM2018-01-27T22:20:37+5:302018-01-27T22:21:15+5:30
आंबेडकरी साहित्य संमेलनातुन नेहमी नवीन ऊर्जा प्राप्त होते. अशी साहित्य संमेलने नवीन पिढीसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपदान खासदार सप्रिया सुळे यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
उमरखेड : आंबेडकरी साहित्य संमेलनातुन नेहमी नवीन ऊर्जा प्राप्त होते. अशी साहित्य संमेलने नवीन पिढीसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपदान खासदार सप्रिया सुळे यांनी केले. त्या शनिवारी येथील आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
कोरेगाव-भीमा शौर्य दिन द्विशतकपूर्तीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकरी प्रबोधन पर्व समिती व दिशा सामाजिक संस्था उमरखेडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे शनिवारी थाटात उद्घाटन झाले. दिवंगत खासदार हरिहरराव सोनुले साहित्यनगरी व सत्यशोधक भाऊसाहेब माने विचारमंच येथे दोन दिवसांचे हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या उद्घाटपर भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे साहित्य संमेलन ही नवीन पिढीसाठी खूप महत्त्वाचे असून ती काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य शासनावर कडाडून टिका केली. शासनाकडून मराठी भाषेला न्याय मिळत नसल्याने सर्वांनी मिळून मराठी भाषा वाचविण्यासाठी लढा उभा करण्याची गरज प्रतिपादीत केली. आपल्या ४५ मिनीटांच्या भाषणात त्यांनी साहित्य क्षेत्रातील नामवंतांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या साहित्य संमेलनातून मी नवीन ऊर्जा घेऊन जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष आनंद गायकवाड उपस्थित होते. मंचावर स्वागताध्यक्ष डॉ. विजय माने, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, आमदार ख्वॉजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया व विजयराव खडसे, डॉ.आरती फुफाटे, देवानंद पवार, सभापती प्रवीण मिरासे, नगराध्यक्ष नामदेव ससाने, वसंतराव घुईखेडकर, अॅड. आशिष देशमुुख, ययाती नाईक, डॉ. अंकुश देवसरकर आदी उपस्थित होते.
संचालन विलास भवरे, प्रास्ताविक अनिल काळबांडे यांनी केले. आभार प्रेम हनवते यांनी मानले. या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शासनाचा केला निषेध
महाराष्ट्र शासनाने १३०० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मराठी भाषेचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. मराठीचे अस्तित्वच संपविण्याचा हा प्रकार आहे. आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यानी मराठी भाषेचा अपमान सहन केला नसता. त्यांची खूप उणीव भासत आहे, असे प्रांंजळ मनोगत खासदार सुळे यांनी व्यक्त केले. शासनाच्या या निर्णयाविरूद्ध त्यांनी शासनाचा जाहीर निषेध केला. तसेच साहित्य संमेलनात निषेधाचा ठराव पारित करण्याची सूचनाही केली.