नवीन पदाधिकाऱ्यांची कसोटी
By admin | Published: April 6, 2017 12:25 AM2017-04-06T00:25:56+5:302017-04-06T00:25:56+5:30
जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकाऱ्यांची इनिंग सुरू झाली आहे. बुधवारी तीन सभापतींनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळही वाढली.
जिल्हा परिषद : दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळ वाढली
रवींद्र चांदेकर यवतमाळ
जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकाऱ्यांची इनिंग सुरू झाली आहे. बुधवारी तीन सभापतींनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांची वर्दळही वाढली. सर्व पदाधिकारी अननुभवी असल्याने त्यांची कसोटी लागणार आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व अपक्षांची संयुक्त सत्ता स्थापन झाली. अध्यक्षपद काँग्रेसकडे, तर उपाध्यक्षपद भाजपाकडे गेले. सभापती पदांमध्ये प्रत्येकाच्या वाटणीला एक पद आले. नवीन सहाही पदाधिकारी नवखे आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचा गाडा हाकताना नवोदितांची कसोटी लागणार आहे. आधीच शिरजोर झालेल्या प्रशासनावर नियंत्रण ठेवत त्यांना जिल्ह्यातील जनतेच्या आकाक्षांची स्वप्नपूर्ती करावी लागणार आहे. त्यात प्रचंड आक्रमक विरोधकांनाही तोंड द्यावे लागणार आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती नवखे असले, तरी त्यांच्या पाठीमागे मातब्बर नेते आहेत. तथापि तीन पक्ष व अपक्षाची मोट बांधून सत्ता स्थापन झाल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींचे नेमके नेते कोण, असा प्रश्न चर्चीला जात आहे. काँग्रेस, भाजप, अपक्ष व राष्ट्रवादीपैकी नेमक्या कोणत्या पक्षाचे नेते त्यांच्यासाठी निर्णायक असतील, हे येणारा काळच सांगणार आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांची मांदियाळी आहे. भाजपामध्ये नव्याने अनेक नेते तयार झाले. राष्ट्रवादीतही पूर्वीसारखे एक खांबी नेतृत्व उरले नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती निवडीच्या दिवशी या तीनही पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांची जिल्हा परिषदेत चांगलीच गर्दी झाली होती.
सत्तेसाठी एकत्र आलेल्यांचे नेमके नेते कोण ?
अंतिम शब्द कोणत्या पक्षाचा
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, अपक्ष यांच्यात मातब्बर नेते आहेत. त्यांचा शब्द त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी अंतिम राहणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेवर नेमकी कोणत्या पक्षाची सत्ता असेल, हे सांगणे कठीण झाले आहे. ‘तीन तिघाडा-काम बिघाडा’, अशी स्थिती आहे. राज्य व देशात एकमेकांविरूद्ध असलेले पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याने जिल्हा परिषदेचा गाडा हाकताना नव्या आणि नवख्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कसोटी लागण्याचे संकेत आहे.
नेत्याचा शब्द कितपत प्रमाण मानतील
सत्ताधाऱ्यांमध्ये तीनही पक्ष आणि अपक्षांचे स्वयंभू नेते आहे. त्यामुळे त्यांचे पदाधिकारी त्यांच्याच नेत्याचा शब्द प्रमाण मानतील. परिणामी सत्तेसाठी एकत्रित आलेल्या सत्ताधाऱ्यांचे नेमके नेते कोण, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्षांचे नेते आपापल्या पदाधिकाऱ्यांना निर्देश देतील. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये एकजिनसीपणा असेल किंवा नाही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. सभापती निवडीच्या दिवशी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. त्यावरून सत्ताधाऱ्यांचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. परिणामी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या मागे फरफटत जाणार असल्याचे स्पष्ट झाले.
बुधवारी तीन सभापतींनी स्वीकारला पदभार
बुधवारी तीन सभापतींनी कार्यभार स्वीकारला. यावेळी काँग्रेस, अपक्ष, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. यात माजी आमदारांसह माजी पदाधिकारी, कंत्राटदारांचाही समावेश होता. उपाध्यक्षांच्या कक्षात अनेकांची गर्दी झाली होती. मात्र या सर्वांत एकमुखी नेतृत्व म्हणून कुणीच दिसून येत नव्हते. परिषदेचा गाडा हाकताना नव्या आणि नवख्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे.