उदापूर पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:45 PM2018-12-18T22:45:49+5:302018-12-18T22:46:38+5:30
टाकळी (डोल्हारी) सिंचन प्रकल्पासाठी पुनर्वसन होत असलेल्या उदापूर गावाच्या पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया राबवा, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अमरावती उपविभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : टाकळी (डोल्हारी) सिंचन प्रकल्पासाठी पुनर्वसन होत असलेल्या उदापूर गावाच्या पुनर्वसनाची नवीन प्रक्रिया राबवा, असे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. अमरावती उपविभागीय आयुक्त कार्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यात प्रकल्पग्रस्तांची बाजू आमदार बच्चू कडू यांनी मांडली. विदर्भ सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील देशमुख यावेळी उपस्थित होते.
गावकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खोट्या दस्तावेजाद्वारे पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात आली. याविषयी प्रकल्पग्रस्तांनी तक्रार केली. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, पाटबंधारे अधीक्षक अभियंता, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना उपस्थित मंत्र्यांनी विचारणा केली. त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन पुनर्वसनात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. पुनर्वसन बेकायदेशीर असल्याच्या निष्कर्षाप्रत मंत्री पोहोचले. आतापर्यंत झालेली संपूर्ण प्रक्रिया रद्द करून गावकऱ्यांना विश्वासात घेऊन एका जागेचा ग्रामसभा, गावकऱ्यांच्या सोयीचा ठराव घेवून नवीन पुनर्वसन प्रक्रिया राबवावी, असे आदेश देण्यात आले. आता पुनर्वसनासंदर्भात काय निर्णय लागतो, याकडे उदापूरसह प्रकल्पबाधित गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
व्यापाऱ्यांच्या जमिनी खरेदीचा घाट
उदापूर ग्रामवासियांना विश्वासात घेण्यात आले नाही. मनमर्जीने पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठीचा घाट रचला गेला. दारव्हा सिंचन उपविभागातील उपअभियंता सुधीर पवार यांनी यात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यांची तत्काळ बदली करावी, चौकशीत गैरप्रकार आढळल्यास या अभियंत्याला निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी जलसंपदा मंत्र्यांना प्रकल्पग्रस्तांनी निवेदन सादर केले.
तीव्र आंदोलनाचा इशारा
आजंती रोडवरील पुनर्वसन रद्द करण्याचा सूचना ना. गिरीश महाजन यांनी केल्या. यानंतरही पुनर्वसन रद्द न झाल्यास आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. यावेळी प्रा. अजय दुबे, उदापूरच्या उपसरपंच कविता भोयर, माजी सरपंच रामेश्वर सांगळे, अजय भोयर, प्रकल्पग्रस्त रवींद्र मुंडे, किसनराव मनवर, राजू जुनघरे, पुरुषोत्तम भोयर, श्रीराम इरपाते, नरेश कोकाटे, विलास पवार, संदीप करपते, भोयर, बाळू पवार, विजय श्रृंगारे, नीलेश तोंडे, चौधरी, दिलीप तिजारे, डॉ.वसंत सांगळे, रामहरी कावळे, साधू इंजाळकर, झोडपाटील, गजानन इसाळकर, बबन खोडे, कैलास कटके, पप्पु तायडे, हेमंत भोयर आदी उपस्थित होते.