शहर स्वच्छतेसाठी नवीन यंत्रणा राबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:21 PM2018-09-11T22:21:00+5:302018-09-11T22:21:34+5:30
शहर स्वच्छता यंत्रणेतील उणिवा ‘लोकमत’ ने वृत्ताच्या माध्यमातून मांडताच याची दखल पालिका प्रशासनाने घेतली. आरोग्य सभापतींनी हद्दवाढ झालेल्या क्षेत्रातील सर्वच विभागीय कार्यालयात स्वच्छता यंत्रणेत मोठे फेरबदल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहर स्वच्छता यंत्रणेतील उणिवा ‘लोकमत’ ने वृत्ताच्या माध्यमातून मांडताच याची दखल पालिका प्रशासनाने घेतली. आरोग्य सभापतींनी हद्दवाढ झालेल्या क्षेत्रातील सर्वच विभागीय कार्यालयात स्वच्छता यंत्रणेत मोठे फेरबदल केले. येथील यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर विभाग प्रमुखांना जबाबदारी सोपविली. वडगाव येथील नगरपरिषद विभागीय कार्यालयात मुख्याधिकारी अनिल अढागळे आणि आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी संयुक्त आढावा घेतला. प्रत्येक प्रभागात कचरा संकलन करून डेपोवर नेण्याचे नियोजन केले. मोकाट कुत्रे, डुक्कर पकडून जंगलात सोडण्याची योजना तयार करण्यात आली.
या बैठकीला अभियंता, आरोग्य निरीक्षक, विभागप्रमुख, वार्ड शिपाई, लिपिक,व सर्व साफसफाई कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य सभापतींनी बंद असलेल्या ११ घंटागाडी सुरु करण्यासाठी व नाली सफाईसाठी तीन कर्मचारी, कचरा उचलण्यासाठी एक ट्रॅक्टर त्यावर तीन तीन कर्मचारी ठेवण्याचे नियोजन केले. वडगाव रोड येथील मोक्षधामच्या स्वच्छतेसाठी पूर्णवेळ एक कर्मचारी नियुक्त केला आहे. या परिसरातील गाजर गवत काढून मोहिमेची सुरुवात दिनेश चिंडाले यांनी केली.
वडगावरोड विभागीय कार्यालय बाजार अधीक्षक विनोद अंबाडकर यांच्याकडे सोपवीले आहे. लोहारा कार्यालय विद्युत विभाग प्रमुख पराग नवरे, वाघापूरचा प्रभार सहाय्यक कर अधीक्षक डी.एम.मेश्राम यांच्याकडे आहे. उमरसरा येथील काम विधी विभागाचे सुरज पाखरे, पिंपळगावची जबाबदारी कर संग्राहक प्रमोद सिंपतवार यांच्याकडे आहे. भोसा कार्यालय विनोद बारस्कर, मोहाचा पदभार सहायक कार्यालय अधीक्षक राम श्ािंदे यांच्याकडे आहे. या सर्व विभाग प्रमुखांच्या देखरेखित सात कार्यालयाची यंत्रणा नव्याने कार्यान्वित केली जाणार आहे.