नवजात बालकांसाठी ५० खाटांचे नवे युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 10:11 PM2018-09-27T22:11:16+5:302018-09-27T22:12:55+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सहकार्याने ५० बेडचे नवजात शिशू दक्षता कक्ष उभारले जाणार आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनातर्फे संयुक्तपणे हे युनिट सुरू केले जाईल.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सहकार्याने ५० बेडचे नवजात शिशू दक्षता कक्ष उभारले जाणार आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, टाटा ट्रस्ट आणि राज्य शासनातर्फे संयुक्तपणे हे युनिट सुरू केले जाईल.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अतिदुर्गम भागातील महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. येथे प्रसूतीकरिता येणाऱ्या महिलांची संख्या सर्वाधिक असते. मात्र शिशू दक्षता कक्षात पुरेशी व्यवस्था नसल्याने नवजात बाळांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी न्यावे लागते. सर्वसामान्यांना खासगी रूग्णालयात होणारा उपचार महागडा ठरतो. वेळेपूर्वी जन्माला आलेले बाळ, कुपोषित बालके, कावीळ, प्रसूतीदरम्यान किचकट प्रकरणात बाळाला काही दिवस अतिदक्षता कक्षात ठेवले जाते. त्यासाठी शासकीय रूग्णालयात केवळ १४ बेड उपलब्ध आहे. आता नवजात बालकांसाठी स्वतंत्र शिशू संगोपन कक्ष उभारला जाणार आहे. वार्ड क्रमांक १० मध्ये ५० बेड क्षमतेचे हे संगोपन केंद्र राहणार आहे. या कक्षात शासकीय रूग्णालयात प्रसूत होणाºया महिलांच्या बालकांसह बाहेर ठिकाणी प्रसूत झालेल्या बालकांवरही उपचार केला जणार आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्याकरिता पुढाकार घेतला आहे. नुकतीच या संदर्भात डॉ.निलीमा राघवन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. त्यांनी अधिष्ठात्यांची भेट घेतली. त्या अनुषंगाने लागणारी उपकरणे आणि डॉक्टरांची उपलब्धता आहे किंवा नाही, याची त्यांनी माहिती घेतली. डॉक्टरांची कमतरता भासल्यास त्यांची पदे शासकीय स्तरावर मंजूर करून घेतली जाणार आहे. बुधवारी टाटा ट्रस्टचे संचालक डॉ.विनय कोठारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.
खासगी रुग्णालयातील दर भिडले गगणाला
नवजात शिशूंच्या असलेल्या अतिदक्षता कक्षाचे खासगी रूग्णालयातील दर गगनाला भिडलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य रूग्णांची आर्थिक लूट होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा अतिदक्षता कक्ष सुरू झाल्यानंतर खासगी डॉक्टरांच्या आर्थिक लुटीला लगाम बसणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तयार होणाºया नवजात शिशू अतिदक्षता कक्षामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळेल. काम युद्धपातळीवर सुरू आहे. आढावा बैठकी सुरू आहे.
- डॉ.मनीष श्रीगिरीवार
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.