जिल्हा परिषद गट आणि गणांची नव्याने फेररचना
By Admin | Published: August 20, 2016 12:03 AM2016-08-20T00:03:19+5:302016-08-20T00:03:19+5:30
जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची नव्याने फेररचना होणार आहे.
२०११ च्या जनगणनेचा आधार : २०१७ मध्ये होणार निवडणूक
यवतमाळ : जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची नव्याने फेररचना होणार आहे. त्यासाठी सन २०११ ची जनगणना गृहित धरण्यात येणार असून नगरपरिषद प्रभाग रचनेप्रमाणेच सॅटेलाईटव्दारे या गट आणि गणांची पुनर्रचना होण्याचे संकेत आहे.
येत्या जानेवारी-फेब्रुवारीत जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समित्यांची निवडणूक होऊ घातली आहे. आत्तापर्यंत जिल्हा परिषदेचे ६२ गट आणि १२४ गण होते. त्यापूर्वी ६३ गट आणि १२६ गण होते. पाच वर्षांपूर्वी एक गट आणि दोन गण कमी झाले होती. आता पुन्हा ६२ गट आणि १२४ गणांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. यवतमाळ नगरपरिषदेत लगतच्या आठ ग्रामपंचायती समाविष्ट झाल्या. तसेच जिल्ह्यातील सहा ठिकाणी नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यामुळे गट आणि गणांची पुनर्रचना करणे आवश्यक झाले आहे.
यवतमाळ शहरालगतच्या आठ ग्रामपंचायत नगरपरिषदेत समाविष्ट झाल्या. त्याचप्रमाणे कळंब, राळेगाव, मारेगाव, झरी, बाभूळगाव आणि महागाव या सहा तालुका ठिकाणी नगर पंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यवतमाळ नगरपरिषदेत जवळपास एक लाख ३० हजारांच्यावर, तर सहा नगर पंचायतीत ४० हजारांच्यावर लोकसंख्या नव्याने सहभागी झाली. त्यामुळे गट आणि गणांच्या मतदार संख्येत घट होणार आहे. या बदलामुळेच आता गट आणि गणांची नव्याने फेररचना करावी लागणार आहे.
नवीन फेररचनेत गट आणि गणांची संख्या कमी होण्याचे संकेत आहे. यात यवतमाळला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. यवतमाळ तालुक्यातील किमान दोन ते तीन गट आणि चार ते सहा गण कमी होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी विद्यमान समाजकल्याण सभापती लता खांदवे यांचा मतदार संघ असलेला वडगाव गट रद्द झाला आहे. आता पुन्हा दोन ते तीन गट कमी होण्याचे संकेत आहे. तथापि अधिकृतरित्या राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात अद्याप कोणत्याच सूचना येथील निवडणूक विभागाला दिल्या नाहीत. मात्र सन २०११ च्या जणनगणेचा आधार घेऊन नवीन गट आणि गणांची फेररचना सॅटेलाईटचा वापर करून होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
कळंब, राळेगाव, महागाव, झरी, बाभूळगाव व मारेगावात अदलाबदल
कळंब, राळेगाव, महागाव, झरी, बाभूळगाव व मारेगाव येथे आता नगर पंचायत अस्तित्वात आली. त्यामुळे या तालुक्यातील गट आणि गणांमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या अदलाबदलीत अनेक गावे पूर्वीच्या गट अथवा गणातून नवीन गट अथवा गणात समाविष्ट होतील. या सहाही शहरातील मतदारांना आता जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती सदस्यांना निवडून देता येणार नाही. परिणामी या तालुक्यातील गट आणि गणाची मतदार संख्याही कमी होईल. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार एखादवेळी तेथील गट आणि गणही कमी होतील. मात्र केवळ दोनच गट असलेल्या तालुक्यात यामुळे त्रांगडे निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.