यवतमाळ ‘मेडिकल’च्या कोरोना वॉडार्तून आला वडिलांच्या मृत्यूचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 05:00 AM2021-02-10T05:00:00+5:302021-02-10T05:00:11+5:30
येथील शासकीय कोरोना वॉर्डात उपाचार घेत असलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा निरोप मुलाला फोन कॉलद्वारे मिळाला. वयोवृध्द वडील अचानक सोडून गेल्याची वार्ता कानी पडताच संपूर्ण कुटुंबच शोकसागरात बुडाले, आप्तस्वकीय, नातेवाईक निधनाची माहिती मिळल्याने सांत्वना करण्यासाठी घरी पोहोचले. तोच वडिलांचा श्वास सुरू असल्याचा संदेश मिळाला. हा धक्का त्या परिवारासाठी सहन करण्यापलीकडचा होता. निधनाचा कॉल करणाऱ्याने खातरजमा न करताचा त्या कुटुंबाच्या भावनांशी खेळ केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना वार्डात उपचारार्थ दाखल वृद्ध जीवंत असताना ते मरण पावल्याचा संदेश दिला गेला. त्यामुळे कुटुंबात रडारड झाली. मात्र काही वेळानंतर सदर वृद्ध जीवंत असल्याचे निष्पन्न झाले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड वार्डातील यंत्रणेच्या या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
येथील शासकीय कोरोना वॉर्डात उपाचार घेत असलेल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा निरोप मुलाला फोन कॉलद्वारे मिळाला. वयोवृध्द वडील अचानक सोडून गेल्याची वार्ता कानी पडताच संपूर्ण कुटुंबच शोकसागरात बुडाले, आप्तस्वकीय, नातेवाईक निधनाची माहिती मिळल्याने सांत्वना करण्यासाठी घरी पोहोचले. तोच वडिलांचा श्वास सुरू असल्याचा संदेश मिळाला. हा धक्का त्या परिवारासाठी सहन करण्यापलीकडचा होता. निधनाचा कॉल करणाऱ्याने खातरजमा न करताचा त्या कुटुंबाच्या भावनांशी खेळ केला. मंगळवारी दुपारी ४.४५ वाजता मुलाच्या फोनवर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड रुग्णालयातून तो फोन कॉल आला. संबंधित व्यक्तीने आपला परिचय देत वडिलाचे निधन झाल्याचे सांगितले. हा संदेश मिळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. वडिलांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी परिवार शवचिकित्सागृहात पोहोचला. इकडे यवतमाळातील रामनगर परिसरातील घरी नातेवाईक, मित्रमंडळी सांत्वना करण्यासाठी पोहोचली. रीतिरीवाजाप्रमाणे मयत झालेल्या घरात तयारी सुरू झाली. शवचिकित्सागृहात गेल्यानंतर त्या कुटुंबाला दुसरा धक्का बसला. त्यांनी सांगितलेल्या नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आलेला नव्हता. नेमका काय प्रकार आहे, याची खातरजमा करण्यासाठी शवचिकित्सागृहातील कर्मचारी कोविड वॉर्डात पोहोचला. तेथे त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. निधन झाले नाही, अशीही पुष्टी मिळाली. हे समजून त्या परिवाराला हायसे वाटले. तिकडे घरी जमलेली मडीळीसुध्दा अवघडल्यासारखी झाली.
आरोग्य यंत्रणेने बेजबाबदारपणाचा गाठला कळस
एखाद्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याची माहिती देताना खातरजमा करणे आवश्यक आहे. मात्र, कोविड रुग्णालयातील त्या अधिकाऱ्याने बेजबाबदारपणाचा कळस गाठला. निधनाची माहिती दिली. प्रकृती गंभीर असताना निधनाचा संदेश देऊन त्यांना मानसिक धक्का दिला. काही तासापुरते का होईना त्या उपचार घेत असलेल्या व्यक्तीची पत्नी अवसान गळून पडली होती. कुटुंबातील दोन मुले, सुना, नातवंड या सर्वांनाच शोक अनावर झाला होता.
कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचा निरोप दिला. प्रकरण माहीत झाल्यानंतर त्याची स्वत: चौकशी केली. कुटुंबीयातील सदस्याकडून ऐकण्यात गफलत झाली. त्यांनीच निधनानंतरची प्रक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारली. त्यातून आणखीच गैरसमज झाला. दोघांच्या संभाषणाचे काॅल रेकाॅर्डही असल्यास मागितले. ते मिळू शकले नाही. यात संबंधित डाॅक्टरची कुठलीच चुक नसल्याचे दिसून येते.
- डाॅ. मिलिंद कांबळे,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ