राज्यातील पाच ‘मेडिकल’मध्ये ‘एनआयसीयू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:05 AM2018-06-15T11:05:16+5:302018-06-15T11:05:27+5:30
आता राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत ‘एनआयसीयू’ (निओनेटल इनटेसिव्ह केअर युनिट) साकारले जात आहे. त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या स्टॅँडफोर्ड विद्यापीठाची तांत्रिक मदत घेतली जाणार आहे.
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून अनेक उपक्रम राबविले जातात. त्यानंतरही शासकीय रुग्णालयातील बालमृत्यूचेप्रमाण कमी होत नाही. यासाठी आता शासकीय रुग्णालयात अद्ययावत ‘एनआयसीयू’ (निओनेटल इनटेसिव्ह केअर युनिट) साकारले जात आहे. त्यासाठी कॅलिफोर्नियाच्या स्टॅँडफोर्ड विद्यापीठाची तांत्रिक मदत घेतली जाणार आहे. राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयात सदर युनिट साकरले जाणार असून त्यात यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने बालमृत्यू थांबविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील एनआयसीयूमध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी टाटा ट्रस्टची मदत घेतली जाणार आहे. सुरुवातील प्रायोगिक तत्वावर स्टॅँडफोर्ड विद्यापीठाच्या तांत्रिक मार्गदर्शनात एनआयसीयू तयार केला जात आहे. यासंदर्भात ‘सीएमओ’कडून स्वतंत्र निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील पाच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. यासाठी येथील अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगीरीवार यांनी विशेष पाठपुरावा केला. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात सर्वाधिक प्रसूतीचे प्रमाण आहे. येथे वर्षभरात किमान आठ हजार महिलांची प्रसूती होते. सध्या उपलब्ध असलेल्या एनआयसीयूमध्ये केवळ १७ खाटा आहेत. यामुळे येथे गर्दी होते. परिणामी उपचाराच्या दर्जावरही याचा परिणाम होतो. ही गरज ओळखून यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत एनआयसीयू तयार करण्याचे निर्देश ‘सीएमओ’कडून नुकत्याच झालेल्या व्हीडीओ कॉन्फरसिंगमध्ये मान्य करण्यात आले. यवतमाळच्या ‘मेडिकल’मध्ये लवकरच अद्ययावत ५० खाटांचे एनआयसीयू सुरू होईल. लवकरच यावर प्रशासकीयस्तराव निर्णय होणार आहे. याचा फायदा दुर्गम भागातील नवजात बालकांना होणार आहे.