जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 05:00 AM2021-03-29T05:00:00+5:302021-03-29T05:00:02+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच दिवसा कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर राखणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर हेही बंधनकारक आहे. सार्वजिनक कार्यक्रम, मेळावे, सभा यावर बंदी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी २८ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी हा आदेश जारी केला आहे. संचारबंदी व अन्य निर्बंधांचे पालन होते की नाही, यावर वाॅच ठेवण्यासाठी नगरपालिका, तसेच ग्रामपंचायत व पोलिसांची संयुक्त पथकेही गठित करण्यात आली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आता रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच दिवसा कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फूट अंतर राखणे आवश्यक आहे. मास्क, सॅनिटायझर हेही बंधनकारक आहे. सार्वजिनक कार्यक्रम, मेळावे, सभा यावर बंदी आहे.
सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकणे हा गुन्हा आहे. थुंकल्यास दंड भरावा लागणार आहे, तसेच सार्वजिनक पान, दारू, तंबाखू आदींच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभाकरिता ५० जणांच्या, तर अंत्यविधीकरिता २० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असेल. खासगी आस्थापना ५० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील, तर निर्मिती उद्योग हे पूर्ण क्षमतेसह मात्र सोशल डिस्टन्स पाळून सुरू राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत, तर ठोक भाजीमंडई पहाटे ३ ते सकाळी ६ या काळात सुरू राहील. मात्र, तेथे किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश असेल.
सभागृह, नाट्यगृह, मंगल कार्यालये यांनी उपस्थितीसंदर्भात नियमाचे पालन न केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रीय आपत्ती असेपर्यंत नियम मोडणारी मंगल कार्यालये बंद ठेवली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.
रुग्णांच्या हातावर मारणार शिक्के
होम आयसोलेशनमधील रुग्णांवर आता कठोर नजर ठेवली जाणार आहे. त्याच्या घरासमोर तो पाॅझिटिव्ह असल्याचा ठळक फलक लावला जाणार आहे. त्यात त्याच्या गृहविलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधीही नमूद असेल. तसेच कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शासकीय कार्यालयात बाहेरच्यांना ‘नो एन्ट्री’
शासकीय कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी फक्त लोकप्रतिनिधींनाच प्रवेश दिला जाणार आहे. तर या काळात अन्य अभ्यागतांना प्रवेश नसेल. अत्यावश्यक काम असेल तरच विभाग प्रमुखांची पास घेऊनच बैठकीसाठी जावे लागणार आहे.
हाॅटेलला पार्सलची मुभा
सिनेमागृह, हाॅटेल्स, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद ठेवली जाणार आहे. मात्र हाॅटेल्सला रात्री ११ पर्यंत पार्सल सुविधा पुरविण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
या चुका कराल तर रोख पडेल दंड
संचारबंदीचे उल्लंघन केल्यास प्रती व्यक्ती १ हजार
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार
मास्क न घातल्यास ५००
सार्वजनिक वाहतूक करताना निर्बंध न पाळल्यास ५००