रेती तस्करांचा रात्रीस खेळ चाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 06:00 AM2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:07+5:30

रेतीमाफियांनी उघडपणे आपला व्यवहार सुरू ठेवला आहे. ज्या ठाण्याच्या हद्दीतून प्रवास होतो त्यांना महिन्याकाठी एका घाटावरून ३५ हजार रुपये जातात. या प्रमाणे एकट्या ग्रामीण भागात तीन घाटावरून एक लाख दहा हजार रुपये दिले जाते. अशीच चेन महसूल विभागातही माफियांनी बांधली आहे.

Night game of sand smugglers | रेती तस्करांचा रात्रीस खेळ चाले

रेती तस्करांचा रात्रीस खेळ चाले

Next
ठळक मुद्देमहसूल व पोलीस यंत्रणेची मौज : कोट्यवधी रुपये बुडतात, सर्वसामान्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : रेती भोवती मोठे अर्थचक्र फिरते. साध्या बांधकाम मजुरापासून तर कर्ज घेऊन घर बांधणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसतो. आता रेती घाटांचा लिलाव झालेला नसतानाही दामदुप्पट दराने राजरोसपणे रेती टाकली जात आहे. हा संपूर्ण खेळ रात्रीच्या अंधारात चालतो. यात प्रशासनाचा महसूल बुडत आहे. सामान्यांचीही आर्थिक लूट होत आहे. असले तरी महसूल व पोलीस यंत्रणा मौजेत असून रेतीमाफियांना खुले अभय दिले आहे.
यवतमाळ शहरात सर्वत्र बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम कुठल्याही कारणाने बंद पडल्यास रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा स्थितीत रेतीमाफियांची मोठी चांदी आहे. कायदेशीर रेती उपशावर बंदी असली तरी महसुलातील व पोलीस यंत्रणेतील महाभाग या रेती तस्करीला उघड पाठबळ देत आहेत. यातून त्यांनाही महिन्याकाठी मोठा फायदा होतो. नुकसान मात्र सर्वसामान्यांचे होत आहे. रेतीतून येणारा महसूल बुडल्याने सरकारची गंगाजळी कमी होत आहे. तर बंदीच्या नावाखाली सामान्यांकडून रेतीकरिता अवाजवी दर आकारले जात आहे. नऊ ते दहा हजार रुपये ब्रास प्रमाणे रेती खरेदी करावी लागत आहे. मागाल तितकी रेती देण्यास तयार आहे. फक्त पैसे मोजण्याची ताकद हवी.
असे आहेत पुरवठादार रेती घाट
रेतीमाफियांनी उघडपणे आपला व्यवहार सुरू ठेवला आहे. ज्या ठाण्याच्या हद्दीतून प्रवास होतो त्यांना महिन्याकाठी एका घाटावरून ३५ हजार रुपये जातात. या प्रमाणे एकट्या ग्रामीण भागात तीन घाटावरून एक लाख दहा हजार रुपये दिले जाते. अशीच चेन महसूल विभागातही माफियांनी बांधली आहे. बाभूळगाव तालुक्यातील वर्धा नदीवरील रेतीघाट, सदोबा सावळी ता. आर्णी हे पैनगंगा नदीवरील रेतीघाट, अकोलाबाजार परिसरातील अडाण नदीतून रेती उपसा होत आहे. या घाटावरून येणाºया वाहनांचा टाईमही निश्चित केला आहे. बाभूळगाव घाटावरुन पहाटे ३ ते ४ च्या सुमारास रेती टाकली जाते. सदोबा सावळी घाटावरील रेती रात्री ८ ते ११ पर्यंत टाकण्यात येते. अकोला बाजार परिसरातील घाटावरून येणारी रेती सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान टाकण्यात येते. या रेतीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असून माफियाराज फोफावला आहे. यंत्रणेकडून रेती वाहनांवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. जशी मागणी त्या पद्धतीने पुरवठा केला जातो. ट्रॅक्टर, ट्रक, टिप्पर ही वाहने सर्रास रेती टाकण्यासाठी वापरली जात आहे. कधी कोणता अधिकारी गोपनीय धाड टाकण्याच्या तयारीत असल्यास यंत्रणेतील फंटर या रेतीमाफियांना आगावू सूचना देतात. त्यामुळे कुणाच्याच हाती ट्रक लागत नाही. चोरीची रेती पकडण्यासाठी कुणीही विशेष असे परिश्रम घेत नाही. केवळ आपला वाटा वाढविण्यासाठी किंवा वरिष्ठांच्या दडपणात एखाद दुसरी कारवाई केली जाते. अन्यथा सर्वांसाठीच मोकळे रान आहे. रेती तस्करीत अनेकांचे हात आकंठ बुडाले आहे.

या माफियांची नावे चर्चेत
किरण, सचिन, सुरेश, गोलू, अमोल, मारोती, संतोष, आदित्य, कादर, सनी, सुनील या रेतीमाफियांची नावे सध्या चर्चेत आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला आहे. यवतमाळ शहरातील लगतच्या भागात असलेल्या शेतांमध्ये, खुल्या जागेवर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा केला जात आहे. या माफियांची दोन वाहने केवळ रेतीसाठा करण्यातच व्यस्त असतात. उर्वरित वाहनांचा वापर बांधकामाच्या ठिकाणी रेती पोहोचविण्यासाठी केला जातो.

Web Title: Night game of sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू