निम्मा महाराष्ट्र टँकरवर; राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:58 PM2024-04-08T12:58:55+5:302024-04-08T12:59:43+5:30
राज्यभरात १,८५८ टँकरव्दारे पाणीपुरवठा, मराठवाडा आघाडीवर
१,४५२ गावे आणि ३,३०१ वाड्यांमध्ये ८२ शासकीय टँकरद्वारे, तर १,७७६ खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. काेकणात ७१, खान्देशमध्ये ४०९, पश्चिम महाराष्ट्रात ३९२, मराठवाड्यात ९५३ आणि विदर्भात केवळ ३३ टँकर सुरू आहेत.
सूरज पाटील
यवतमाळ : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू हाेताच राज्यात पाणीटंचाईचे स्वरूप आणखी तीव्र झाले आहे. काेकण, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टँकर मराठवाड्यात सुरू आहेत. राज्यात एकूण एक हजार ८५८ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून, या पाणीबाणीत टँकर लाॅबी मालामाल हाेत आहे.
उन्हाळा आणि पाणीटंचाई हे समीकरण झाले आहे. उन्हाळ्यात महिला व पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदे साेडून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. काेट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणीटंचाईची समस्या निकाली निघू शकली नाही. त्यामुळे या याेजनांवर झालेला खर्च संशयाच्या भाेवऱ्यात सापडला आहे. अनेकदा टँकर लाॅबीला मालामाल करण्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जाते. येत्या काळात उन्हाचा पारा आणखी वाढणार असून, भीषण टंचाईचे सावट जाणवणार आहे. प्रकल्पातील जलसाठा कमी हाेत आहे. विहिरी काेरड्या पडत आहेत, तर बाेअरवेलच्या पाण्याची पातळी कमी हाेत आहे. ही टंचाई टँकर लाॅबीला मालामाल करणारी ठरत आहे, तर दुसरीकडे टँकरमुक्तीची घाेषणाही हवेत विरली आहे.
येथे शून्य
सिंधुदुर्ग, नंदुरबार, काेल्हापूर, हिंगाेली, नांदेड, अकाेला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गाेंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली या जिल्ह्यांत टँकरची संख्या शून्यावर आहे.