जिल्हा बँक नोकरभरतीसाठी नऊ एजंसी उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:47 PM2019-02-02T23:47:39+5:302019-02-02T23:48:31+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची भरती घेण्यासाठी नऊ एजन्सीजने तयारी दर्शविली आहे. मात्र त्यापैकी केवळ दोनच संस्था शासनाच्या नव्या निकषानुसार पात्र ठरणार असल्याची माहिती आहे.

Nine agencies look forward to the recruitment of district bank | जिल्हा बँक नोकरभरतीसाठी नऊ एजंसी उत्सुक

जिल्हा बँक नोकरभरतीसाठी नऊ एजंसी उत्सुक

googlenewsNext
ठळक मुद्देकेवळ दोनच पात्र : मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची भरती घेण्यासाठी नऊ एजन्सीजने तयारी दर्शविली आहे. मात्र त्यापैकी केवळ दोनच संस्था शासनाच्या नव्या निकषानुसार पात्र ठरणार असल्याची माहिती आहे.
जिल्हा बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी नोकरभरती घेतली जाणार आहे. भरतीची ही प्रक्रिया राबविण्यासाठी एजंसीजचे अर्ज मागण्यात आले होते. शुक्रवार त्यासाठी अखेरचा दिवस होता. एकूण नऊ एजंसीजने ही भरती घेण्याची तयारी दर्शविली. शनिवारी या अर्जांची छाननी करण्यात आली. मंगळवारी ५ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा व निर्णय होणार आहे. शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची नोकरभरती घेण्याबाबत १५ जून २०१८ च्या आदेशान्वये निकष, शर्ती-अटी जारी केल्या आहेत. त्यानुसार प्राप्त नऊ अर्जांपैकी केवळ दोनच संस्था ही भरती घेण्यासाठी पात्र ठरू शकतात, असा अंदाज आहे.
जिल्हा बँकेची ही नोकरभरती आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. शासनाच्या निकषानुसार देशभरातील चारच संस्था ही नोकर भरती घेण्यासाठी पात्र ठरतात. त्यातही तीन संस्थांनी ही भरती घेण्यास नकार दिला आहे. उर्वरित एक संस्था ही भरती प्रक्रिया राबवू शकते. मात्र बँकेकडे आॅनलाईन परीक्षेसाठी तेवढ्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अशावेळी त्या संस्थेने पुण्यात परीक्षा घेतो म्हटल्यास अडचण निर्माण होऊ शकते. लिपिकच नव्हे तर चपराशीपदासाठीसुद्धा उच्चशिक्षित उमेदवार तयारीत आहेत. मात्र त्यांना दुसरा जॉब लागल्यास ते सोडून जातात. पुणे जिल्हा बँकेने ११०० जागांपैकी ३८० जागांची जाहिरात काढली. त्यातही २०० उमेदवारांनाच नियुक्त्या दिल्या. मात्र महिनाभरातच त्यातील २४ जण सोडून गेले. अशीच अवस्था अकोला जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची झाली आहे. म्हणूनच भविष्यात जागा रिक्त राहू नये या दृष्टीनेही यवतमाळ जिल्हा बँकेकडून काळजी घेतली जाणार आहे.
भरतीत गैरप्रकाराला थारा नाही, कुणालाही पैसे देऊ नका
जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही नोकरभरती आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेचे गुण वेबसाईटवर जाहीर केले जातील. त्यामुळे सर्व कारभार पारदर्शक राहील. संचालकांच्या हातात केवळ मुलाखतीचे पाच गुण आहेत. त्या बळावर कुणालाही सिलेक्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या भरतीत गैरप्रकाराला थारा नाही, कुणीही कुणाच्या आमिषाला बळी पडू नये, कुणासोबतही पैशाचे व्यवहार करू नये, असे आवाहन बँकेचे ‘सर्वेसर्वा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका ज्येष्ठ संचालकाने ‘लोकमत’च्या माध्यमातून केले आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता ही भरती पूर्णत: पारदर्शक पद्धतीने व शासनाने सूचविलेल्या देशातील टॉप चार एजंसीपैकी एकाकडून घेण्याचा प्रयत्न आहे. सर्व काही नियमानुसार होणार असल्याने मेरीट असलेल्या उमेदवारालाच प्राधान्य राहील, असेही या संचालकाने स्पष्ट केले. भरतीबाबत बाहेर सुरू असलेली दर, सेटींग, कोटा या सर्वबाबींची चर्चा व्यर्थ असल्याचे व कुणाची इच्छा असलीतरी आॅनलाईनमुळे ते करता येणे कुणालाही शक्य नसल्याचे या संचालकाने सांगितले.

Web Title: Nine agencies look forward to the recruitment of district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.