‘पीएचसी’त उपचाराअभावी नऊ बालके दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:27 PM2019-09-19T12:27:21+5:302019-09-19T12:29:18+5:30

यवतमाळ जिल्ह्यात उपचाराला झालेल्या विलंबाने प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ बालके दगावली असून अनेक मातांची प्रसूती घरीच करावी लागल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

Nine children died at PHC for lack of treatment in Yawatmal district | ‘पीएचसी’त उपचाराअभावी नऊ बालके दगावली

‘पीएचसी’त उपचाराअभावी नऊ बालके दगावली

Next
ठळक मुद्दे‘आशां’च्या संपाचा परिणाम घरी प्रसूती करण्याची पाळी, आरोग्य विभाग बेखबर

विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उपचाराला झालेल्या विलंबाने प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ बालके दगावली असून अनेक मातांची प्रसूती घरीच करावी लागल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. जिल्ह्यात २२०० आशा स्वयंसेविकांच्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संपाने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे. जिल्हा आरोग्य विभाग मात्र यापासून बेखबर आहे, हे विशेष.
गावातील गर्भवती महिलेवर लक्ष ठेवण्यापासून ते रुग्णालयात प्रसूती व बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंतची जबाबदारी आशा स्वयंसेविका पार पाडतात. नियमित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात त्या ही जोखमीची कामे पूर्ण करतात. मागील ३ सप्टेंबरपासून त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे. आरोग्य विभाग ही बाब नाकारत असला तरी, प्रत्यक्षात पुढे आलेल्या घटनांवरून त्यांच्या अनुपस्थितीचा फटका बसत असल्याचे स्पष्ट होते.
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेली आणि नवजात बालके दगावल्याचे सांगितले जाते. यवतमाळ जिल्ह्याच्या काही तालुक्यात या घटना घडल्या आहेत. यवतमाळ, आर्णी, राळेगाव, नेर, पांढरकवडा, उमरखेड या तालुक्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात बालमृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागाने स्पष्ट नकार दिला असलातरी आरोग्य केंद्राशी प्रत्यक्ष कनेक्ट असलेल्या घटकांकडून या बाबीला पुष्टी मिळाली आहे. नवजात अर्भक ते चार ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांचा मृत्यू झालेला आहे. काही बालके रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तत्काळ उपचार आणि उशिरा मिळालेल्या सल्ल्याचे बळी ठरले आहेत.
ग्रामीण भागात साथीचे आजार पसरले आहे. बालकांनाही या आजाराने पछाडले आहे. नागरिकांना याविषयी योग्य मार्गदर्शन आणि उपचार मिळत नसल्याची ओरड आहे. जवळची आरोग्य सेवा म्हणून नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतात. मात्र याठिकाणी उपचार न करता प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्यांना थेट रेफरचा सल्ला दिला जातो. प्रसूतीसाठी आणण्यात आलेल्या महिलांविषयीसुध्दा हाच प्रकार होत आहे. आशांचा संप आणि अपुºया यंत्रणेचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते. सध्यातरी याविषयी आरोग्य विभाग गंभीर नसल्याचे दिसते. मागील दहा ते बारा दिवसात घरी झालेली प्रसूती आणि दगावलेली बालके याचा अहवाल प्राप्त होण्याची प्रतीक्षा करण्यात हा विभाग धन्यता मानताना दिसतो आहे.

दोन आठवड्यापासूनचा संप सुरूच
राज्यभरातील आशा आणि गटप्रवर्तकांनी सुरू केलेल्या संपावरून दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. आशा आणि गटप्रवर्तक यांच्याकडे जवळपास ६४ प्रकारची जबाबदारी आहे. शिवाय स्थानिक पातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितलेली कामे वेगळीच. असे असतानाही आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था केलेली नाही. हीच दिरंगाई बालमृत्यू आणि घरी जोखमीची प्रसूती याला कारणीभूत ठरते आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कुठल्या आरोग्य केंद्रात बालमृत्यू झाले अथवा घरी किती प्रसूती झाल्या याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र आरोग्य विभागाची सेवा सुरळीत सुरू आहे.
- डॉ. टी.एस. चव्हाण, माता बाल संगोप अधिकारी, यवतमाळ

Web Title: Nine children died at PHC for lack of treatment in Yawatmal district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य