..अन् कर्मचाऱ्यांनी झेडपीतच मांडला जुगाराचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 12:39 PM2022-01-30T12:39:29+5:302022-01-30T12:46:39+5:30

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तू परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात जुगार भरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती.

nine detained for gambling in zp yavatmal premises | ..अन् कर्मचाऱ्यांनी झेडपीतच मांडला जुगाराचा डाव

..अन् कर्मचाऱ्यांनी झेडपीतच मांडला जुगाराचा डाव

Next
ठळक मुद्देपोलिसांची धाड : नऊ कर्मचाऱ्यांना अटक

यवतमाळ :जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूच्या प्रांगणातच चक्क जुगार भरला. या जुगार अड्ड्याची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली. या धाडीत नऊ जणांना ताब्यात घेऊन पाच लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

प्रकाश वामनराव कुंदापवार (५३), देवानंद विठ्ठलराव जामनकर (४८), गणेश भीमराव गोसावी (५५), प्रकाश भैयालाल व्यास (५८), गुणवंत तुकाराम ढाकणे (४७), अनिल तुकाराम शिरभाते (४५), संदीप रामराव श्रीरामे (४५), चरण तारासिंग राठोड (५३) आणि येरावत चव्हाण अशी अटकेतील आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहे. यापैकी काही क्लर्क तर काही जण वाहनचालक आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तू परिसरातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसरात जुगार भरत असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री धाड टाकली. या धाडीत नऊ जण जुगार खेळताना आढळले. त्यांच्याजवळून रोख ३१ हजार ११० रुपयांसह नऊ मोबाईल, पाच दुचाकी, दोन चारचाकी वाहने असा एकूण पाच लाख चार हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी धाड टाकताच आरोपी येरावत चव्हाण (५५) हा पसार होण्यात यशस्वी झाला. उर्वरित आठ जणांना पोलिसांनी अटक करून रात्रीच जामिनावर सुटका केली. या सर्वांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असे अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे यांनी सांगितले. 

अनेक महिन्यांपासून सुरू होता अड्डा

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालय परिसरात शुकशुकाट असतो. या परिसरात भरपूर मोकळी जागाही आहे. विशेष म्हणजे याच परिसरालगत जिल्हा परिषद सदस्यांचे प्रतीक्षालय आहे. मात्र हा परिसर नेहमीच सुनसान असल्याने काही क्लर्क, वाहनचालक व इतर कर्मचारी तेथे जुगार अड्डा भरवित होते. अनेकदा येथेच्छ मद्यप्राशनही केले जात होते. या परिसरात जुगार भरत असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. अखेर अवधूतवाडी पोलिसांनी या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. आता सीईओ त्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कारवाईचे निर्देश

जिल्हा परिषद अध्यक्ष कलिंदा पवार यांनी या गंभीर घटनेची नोंद घेत सीईओंना संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध निलंबन व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले. या घटनेमुळे जिल्हा परिषदेची नाचक्की झाल्याची त्यांनी स्पष्ट केले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

Web Title: nine detained for gambling in zp yavatmal premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.