'योनो' वापरणाऱ्या शिक्षकांना नऊ लाखांचा गंडा; सतर्क राहूनही ॲप बंद पाडून पैसे काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 03:38 PM2022-05-30T15:38:16+5:302022-05-30T15:56:27+5:30

अवधूतवाडी पोलीस ठाणे परिसरात एकाच आठवड्यात ऑनलाईन फसवणुकीच्या चार घटना घडल्या आहेत.

Nine lakh theft from two teachers account from Yono app online | 'योनो' वापरणाऱ्या शिक्षकांना नऊ लाखांचा गंडा; सतर्क राहूनही ॲप बंद पाडून पैसे काढले

'योनो' वापरणाऱ्या शिक्षकांना नऊ लाखांचा गंडा; सतर्क राहूनही ॲप बंद पाडून पैसे काढले

Next

यवतमाळ : बॅंक खात्याचा ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी अनेक ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप बॅंकेच्या खात्याशी लिंक करून त्या माध्यमातून व्यवहार केले जातात. अशाच प्रकारे योनो ॲप अनेकजण वापरतात. या ॲपला बंद पाडून दोन शिक्षकांच्या खात्यातून आठ लाख ६७ हजार रुपये चार ट्रान्झेक्शनमधून काढून घेतले.

ही घटना शनिवारी सकाळी ८.३० व दुपारी ३.३० या दरम्यान घडली. किशोर भास्कर बनारसे हे आदर्श शिक्षक आहे. त्यांचे स्टेट बॅंक ऑफ इंडियात खाते आहे. त्यांनी योनो ॲप बॅंक खात्याशी लिंक केला आहे. या ॲपच्या माध्यमातूनच मागील दोन वर्षांपासून ते दैनंदिन व्यवहार करतात. शनिवारी सकाळी त्यांनी बिल भरण्यासाठी योनो ॲप उघडून पाहिले, मात्र ते उघडले नाही. त्यामुळे पेटीएमवरून त्यांनी बिल पेड केले.

नंतर दुपारी ३.३० वाजता योनो ॲपवर बॅलेन्स चेक करण्याकरिता उघडून पाहिले. मात्र ते ओपन होत नव्हते. दरम्यान, त्यांना मॅसेज आला. या मॅसेजमध्ये हे ॲप बंद आहे व त्याला पॅनकार्ड लिंक करा असे सांगितले. ते लिंक करण्यासाठी एसबीआय नेट बॅंकिंग डॉट इन डॉट नेट डॉट प्रिव्हिव डोमेन डॉट कॉमवर क्लिक करा असे सांगण्यात आले. त्यानुसार बनारसे यांनी लिंकवर जात पॅन कार्ड नंबर व योनो ॲपचा युझर आयडी टाकला. हे टाकताच त्यांना आयसीआयसीआय बॅंकेतून फोन आला. तुमचे पैसे क्रेडिट कार्डमधून ट्रान्झेक्शन होत आहे. यावर बनारसे यांनी हे ट्रान्झेक्शन त्वरित थांबवा, असे कुठलेही कार्ड माझ्याजवळ नाही, असे सांगितले. तत्काळ त्यांनी एसबीआयच्या कॉल सेंटर फोन करून तक्रार केली. मात्र, त्यांच्या अकाउंटमधून दोन लाख ९९ हजार ९२३ रुपये व ६७ हजार २२१ रुपये असे दोन ट्रान्झेक्शन एकापाठोपाठ झाल्याचे सांगण्यात आले. बॅंकेतून पैसे उडल्याचे लक्षात येताच बनारसे यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठले.

याच प्रमाणे योनो ॲप वापरणाऱ्या चंद्रशेखर केळतकर यांच्या पत्नीच्या खात्यातूनही पाच लाख रुपये दोन ट्रान्झेक्शनमधून काढून घेतले. विशेष म्हणजे, हे दोघेही गुरुदेवनगरमध्ये शेजारीच राहतात. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कलम ४२० चा गुन्हा दाखल केला आहे.

एकाच आठवड्यात चार घटना

अवधूतवाडी पोलीस ठाणे परिसरात एकाच आठवड्यात ऑनलाईन फसवणुकीच्या चार घटना घडल्या आहेत. ठगाने अधिकृत ॲप वापरणाऱ्या व सतर्क असणाऱ्यांनाही सोडलेले नाही. मात्र, या गुन्ह्यांचा तपास होत नाही, आरोपींना अटक केली जात नाही. सायबर सेलकडून आरोपींचे लोकेशन ट्रेस केले जाते. मात्र, परराज्यात जाऊन आरोपींना अटक करून आणण्यासाठीचा खर्च उपलब्ध नसल्याने पोलीस ठाणे स्तरावरून आरोपींना पकडण्याकरिता कोणीच पुढे येत नाही. तपास खर्च मिळत नसल्याने हा प्रकार होत आहे.

Web Title: Nine lakh theft from two teachers account from Yono app online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.