बिटरगाव ठाण्यात फिर्याद नोंदवूनही गुन्हा दाखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:39 AM2021-03-07T04:39:02+5:302021-03-07T04:39:02+5:30
लॉकडाऊनमध्ये स्वस्त धान्य दुकानातून सर्वांना मोफत धान्य माल देण्यात आला. मात्र, रूपेश यांना धान्य न दिल्याने त्यांनी ...
लॉकडाऊनमध्ये स्वस्त धान्य दुकानातून सर्वांना मोफत धान्य माल देण्यात आला. मात्र, रूपेश यांना धान्य न दिल्याने त्यांनी चौकशी केली. स्वस्त धान्यधारक रामराव गायकवाड व सतीश जन्नावर यांनी माल बहुतांश लोकांना न देता स्वतः हडप केल्याचे त्यांना समजले. पुरावे जमा करून त्यांनी तहसीलदार पुरवठा निरीक्षकांकडे तक्रार केली. त्यामुळे त्यांना दोघांनी मारहाण करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे रूपेश जिल्हावार यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
याप्रकरणी ते बिटरगाव ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले असता ठाणेदारांच्या बाजूलाच स्वस्त धान्य दुकानदार बसून होते. ठाणेदारांनी तक्रार न घेता उद्धट भाषा वापरून मला परत केल्याचा आरोप त्यांनी केला. नंतर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदविली. मात्र, चार महिन्यांपासून न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता २९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.