वेळापत्रक पाहून प्रवास ठरवाल तर फसाल; एसटीच्या ५० टक्के बसफेऱ्या बंदही झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 03:52 PM2023-02-25T15:52:58+5:302023-02-25T15:53:19+5:30

पाच वर्षे जुने फलक : नवीन वेळापत्रक तयार करण्याची गरज

No change in bus timetables for five years, misleading passengers; 50 percent of bus journeys are also closed | वेळापत्रक पाहून प्रवास ठरवाल तर फसाल; एसटीच्या ५० टक्के बसफेऱ्या बंदही झाल्या

वेळापत्रक पाहून प्रवास ठरवाल तर फसाल; एसटीच्या ५० टक्के बसफेऱ्या बंदही झाल्या

googlenewsNext

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर झळकत असलेले बसफेऱ्यांचे वेळापत्रक प्रवाशांची दिशाभूल करणारे ठरत आहे. त्यावर लिहिलेल्या टायमिंगमधील ५० टक्के बसफेऱ्या बंद झालेल्या आहेत. सन २०१८ पासून या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला नाही. बसगाड्यांचा तुटवडा, उत्पन्न मिळत नसल्याने बंद करण्यात आलेल्या फेऱ्या, आदी कारणांमुळे टायमिंग बदलले आहे. तरीही नवीन वेळापत्रक तयार करण्याची गरज महामंडळाला वाटलेली दिसत नाही.

एसटी महामंडळाकडून दरवर्षी जून महिन्यात अद्ययावत वेळापत्रक प्रत्येक बसस्थानकावर प्रसारित केले जाते. त्यासाठी दैनंदिन बसफेऱ्यांचे उत्पन्न व प्रवासी प्रतिसादाचा विचार केला जातो. ज्या फेऱ्या कमी प्रवासी प्रतिसादाच्या आहेत, त्या बंद करून प्रवाशांनी मागणी केलेल्या अथवा चांगले उत्पन्न देणाऱ्या मार्गावर बसफेऱ्या वाढविल्या जातात. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रवासी संघटनांनी केलेल्या मागण्यांचाही विचार केला जातो. यातून सर्वसमावेशक वेळापत्रक तयार केले जाते.

प्रथम जिल्ह्यातील बसफेऱ्यांची आखणी केली जाते. नंतर आंतरजिल्हा व आंतरप्रदेशांच्या बाबतीत मध्यवर्ती कार्यालयातून सूचना प्रसारित करून एकमेकाला समांतर ठरणार नाहीत, अशा बसफेऱ्या सुरू करण्याची परवानगी दिली जाते. अंतिमत: हे वेळापत्रक प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांसाठी प्रसिद्ध केले जाते. परंतु, सन २०१८ पासून ही प्रक्रिया राबविली गेली नसल्याची माहिती आहे. सध्या बसस्थानकांवर दिसत असलेले वेळापत्रक सन २०१८-१९ मधील आहे.

महामंडळाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी वेळापत्रकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या वाहतूक शाखेने वेळापत्रक अद्ययावत करून ते प्रत्येक बसस्थानकावर प्रदर्शित करणे गरजेचे होते. यातून प्रवाशांना बस प्रवासाची निश्चित वेळ समजणे सोपे झाले असते. बसस्थानकावरून सुटणाऱ्या बसफेऱ्यांच्या अनियमितपणामुळे अनेक प्रवासी खासगी बसेसकडे वळल्याचे दिसून आले आहे.

काही धावतात फुल्ल तर काही रिकाम्या

अद्ययावत वेळापत्रकाअभावी समांतर फेऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासी उत्पन्न वाढवण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या वेळापत्रकाकडे एसटीचे दुर्लक्ष झाले आहे. एकाच मार्गावर अनेक आगाराच्या बसेस एकामागे एक धावताना दिसत आहेत. यातील काही बसेस नाममात्र प्रवासी घेऊन जातात, तर काही बसमध्ये जागा मिळत नाही. रिकाम्या धावणाऱ्या बसचा फटका महामंडळाला बसत आहे.

Web Title: No change in bus timetables for five years, misleading passengers; 50 percent of bus journeys are also closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.