ना घर, ना दिवा; बारावीत मात्र घवघवीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:43 PM2018-06-03T23:43:45+5:302018-06-03T23:43:45+5:30
ना रहायला घर... ना उजेडासाठी दिवा... ना घरुन शिकण्यासाठी प्रेरणा, अशा परिस्थितीत दररोज सहा किलोमीटर मानव विकास मिशनच्या बसने येजा करून एका पारधी बेड्यावरील विद्यार्थिनीनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : ना रहायला घर... ना उजेडासाठी दिवा... ना घरुन शिकण्यासाठी प्रेरणा, अशा परिस्थितीत दररोज सहा किलोमीटर मानव विकास मिशनच्या बसने येजा करून एका पारधी बेड्यावरील विद्यार्थिनीनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. आरती राजाबाबू राठोड असे या जिद्दी विद्यार्थिनीचे नाव असून तिने बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ६१.३८ टक्के गुण मिळविले आहे.
किनवट शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर अंबाडी तांडा आहे. तेथे आरती राठोड हिचे पाल वजा घर आहे. पारधी घरकुल योजनेत आईच्या नावाने घरकूल मिळाले. आई-वडील उदरनिर्वाहसाठी सदैव भटकंतीलाच. वन विभागाच्या जाचक अटीमुळे परंपरागत शिकारीचा व्यवसायही बंद. त्यामुळे गावोगावी फुगे विकून जीवन जगणे हाच या परिवाराचा व्यवसाय. अशा अवस्थेत गावातीलच जिल्हा परिषद शाळेत आरती शिकू लागली. विदर्भातील अनसिंग येथे तिने दुसरी ते सातवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तेलंगणातील आदिलाबाद येथे आठवी आणि महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घोटी येथे नववीपासून शिक्षण घेतले.
दहावीच्या परीक्षेत तिने घवघवीत यश मिळविले होते. ४८.६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणारी ती या परिसरातील पारधी समाजातील एकमेव विद्यार्थिनी होती. परंतु तिच्याकडे कोणतेही जात प्रमाणपत्र नसल्याने शैक्षणिक सवलतीचा लाभ मिळाला नाही. वसतिगृहातही प्रवेश मिळाला नाही. अशा बिकट परिस्थितीत तिने दररोज मानव विकासच्या बसने ये-जा करून बारावीची परीक्षा दिली. जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर ती ६१.३८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत तिची टक्केवारी कमी असली तरी तिच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास ती मेरिटच आहे.
दहाव्या वर्गात आरती पास झाली. तेव्हा शिवसेनेचे युवा नेते सचिन नाईक यांनी धो-धो पावसात तिचे घर गाठले. तिचे अभिनंदन करून दहा हजार रुपयांची मदत केली होती. अशाच प्रकारे सामाजिक संस्था, दाते व शासन स्तरावरून आरतीला सुविधा मिळाल्यास ती शैक्षणिक क्षेत्रात आपले नाव उज्वल केल्याशिवाय राहणार नाही.