ना तार्इंचे, ना भाऊंचे, आम्ही फक्त साहेबांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:14 AM2017-07-18T01:14:52+5:302017-07-18T01:14:52+5:30
जिल्हा शिवसेनेतील गटबाजी उफाळून आल्यानंतर नेमके कुणाच्या मागे उभे रहावे, असा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे.
निष्ठावंत शिवसैनिकांची रोखठोक भूमिका : गटबाजीवर खंत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा शिवसेनेतील गटबाजी उफाळून आल्यानंतर नेमके कुणाच्या मागे उभे रहावे, असा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे. निष्ठावंत शिवसैनिक मात्र ‘ना आम्ही भाऊंचे, ना तार्इंचे, आम्ही फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे’ अशी रोखठोक भूमिका मांडताना दिसत आहेत.
जिल्हा शिवसेनेतील नेत्यांमधील भांडणे ‘मातोश्री’पर्यंत पोहोचली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढे दोनही नेत्यांनी युक्तीवाद केल्यानंतरही वाद मिटत नसल्याचे पाहून अखेर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना यवतमाळ-वाशिम जिल्ह्यात पाठविण्याचा निर्णय ‘मातोश्री’वरून घेण्यात आला आहे. आता रामदास कदम यांच्या अहवालानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सेना नेत्यांच्या दोनही गटांनी अधिकाधिक संख्याबळ जुळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. काही शिवसैनिक छातीठोकपणे आपण कोणत्या गटासोबत आहोत हे सांगत आहे. तर दोनही तबले वाजविणाऱ्या शिवसैनिकांना मात्र आता उघडे पडण्याची भीती वाटू लागली आहे. नेमके कुणाच्या गटात जावे, याचा संभ्रम त्यांच्यात पहायला मिळतो. त्याचवेळी निष्ठावंत शिवसैनिकांनी मात्र रोखठोक भूमिका मांडली आहे.
या शिवसैनिकांच्या मतानुसार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड हेसुद्धा आमचे नेते आहेत आणि खासदार भावनाताई गवळी यासुद्धा आमच्या नेत्या आहेत. आम्हाला हे दोनही नेते सारखेच आहेत. आम्ही यापैकी कोणत्याच गटाचे नाहीत. आम्ही केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सैनिक आहोत. स्वाक्षरी मोहीम राबविल्यास आम्ही या दोनही नेत्यांना स्वाक्षरी देऊ, अशी भूमिका या निष्ठावंतांनी मांडली आहे. हे निष्ठावंत म्हणतात, आम्हाला पद नको, लाभ नको, ना ठेका नको, आम्ही वर्षानुवर्षे शिवसेनेसोबत आहो आणि राहू. यातील बहुसंख्य शिवसैनिक कधीच नेत्यांच्या बंगल्यावर किंवा शासकीय विश्रामभवनावर दिसत नाहीत. ते नियमित आपल्या कामात असतात. मात्र त्यांची निष्ठा कायम शिवसेनेसोबत आहे. विशेष असे विविध निवडणुकांमध्येसुद्धा त्यांची निष्ठा डगमगत नाही.
शिवसेनेत उफाळून आलेल्या या गटबाजीवर हे निष्ठावंत शिवसैनिक तीव्र नाराजी आणि खंतही व्यक्त करीत आहेत. ही गटबाजी अनावश्यक असल्याचे ते सांगतात.
काटेकोर मूल्यमापन अपेक्षित
शिवसेनेतील या निष्ठावंत कार्यकर्त्यांना नेते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचे काटेकोर मूल्यमापन होण्याची अपेक्षा आहे. जिल्हा प्रमुख पदावरील व्यक्तीची उपलब्धी काय, त्याने किती लोकप्रतिनिधी निवडून आणले, त्याच्यामुळे किती कार्यकर्ते पक्ष सोडून गेले व ते दुसऱ्या पक्षातून निवडून आले, नेते, जिल्हा प्रमुखांनी किती ठिकाणी पक्षबांधणीसाठी बैठका घेतल्या, शिवसैनिकांना पक्ष वाढीसाठी किती कार्यक्रम दिले, त्यांच्या किती अडचणी सोडविल्या, विकासासाठी किती निधी आणून दिला, गटबाजीला नेमके खतपाणी कोण घालतेय, या गटबाजीमुळे कुठे नियुक्त्या रखडल्या आहेत काय, युवा सेनेला पक्षात जनतेच्या प्रश्नावर केव्हाही आणि कुठेही आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य आहे काय, निवडणुकांमध्ये नेत्यांच्या सोईची व अन्य पक्षांना फायदा होणारी भूमिका घेतली जाते काय?, वारंवार अपयश येऊनही एकाच व्यक्तीकडे महत्वाचे पद ठेवले जात काय?, लाभाचे पद देताना किती निष्ठावंतांचा विचार झाला, कायम मागे-पुढे फिरणाऱ्या, जी हुजरी करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच लाभ दिला जातो का, शिवसेनेच्या नवीन किती शाखा उघडल्या, जुन्या शाखांचे काय, किती गावात फलक लागले, गाव आणि शाखानिहाय कार्यकर्त्यांची यादी उपलब्ध आहे काय, अशा विविध मुद्यांची निष्ठावंत व सामान्य शिवसैनिकांना उत्तरे हवी आहेत.
रामदास कदम यांच्या दौऱ्यावर नजरा
शिवसैनिक म्हणून मर्यादा आहे, पक्षांच्या नेत्यांना-पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्याची हिंमत सामान्य कार्यकर्ता करू शकत नाही. कुणी तसा प्रयत्न केल्यास त्याला बंडखोर म्हणून पक्षाबाहेर काढले जाण्याची भीती आहे. म्हणूनच या सामान्य शिवसैनिकांच्या नजरा आता जिल्ह्यातील गटबाजीच्या चौकशीसाठी खास ‘मातोश्री’हून पाठविण्यात येणाऱ्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दौऱ्याकडे लागल्या आहेत. ना. कदम यांनी उपरोक्त तमाम मुद्यांवर नेते-पदाधिकाऱ्यांना जाब विचारावा आणि जिल्हा शिवसेनेतील वास्तव ‘मातोश्री’वर पोहोचवावे, अशी रास्त अपेक्षा या निष्ठावंतांची आहे.
लाभ नको, सन्मान हवा
खुद्द ‘मातोश्री’ सामान्य शिवसैनिकाला किंमत देते, शिवसेना प्रमुख हे सामान्य शिवसैनिक शिवसेनेचे पाईक असल्याचे मानत होते. मात्र जिल्हा स्तरावरील नेते मंडळी या शिवसैनिकांना तेवढी किंमत, मान-सन्मान देताना दिसत नाहीत. केवळ निवडणुकांच्या वेळीच कुण्या गावात आपला कोण कार्यकर्ता आहे, याची आठवण नेत्यांना होते, अशा शब्दात हे निष्ठावंत आपली खंत व्यक्त करताना दिसत आहेत.