नव्या वसाहतींत ना पाणी, ना धड रस्ते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 05:00 AM2020-12-18T05:00:00+5:302020-12-18T05:00:06+5:30

यवतमाळ शहराची सुरुवात होत असलेल्या प्रभाग क्र.१ मध्ये अगदीच दुर्लक्षित असे पोड आहेत. त्यात लोखंडबर्डी, उकंडा पोड, जामडोह, मासोळी पोड, करकडोह पोड, मोहा गावठाण, पहूर पुनर्वसन हा धामणगाव मार्गावरील परिसर येतो. येथे अजूनही बऱ्याच ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तेथील नागरिकांनाही आपण जिल्हा मुख्यालयाच्या नगरपरिषदेत राहतो हे वास्तव माहीत नाही. आता काही भागात कामे होत आहेत.

No water, no roads in the new colonies! | नव्या वसाहतींत ना पाणी, ना धड रस्ते !

नव्या वसाहतींत ना पाणी, ना धड रस्ते !

googlenewsNext
ठळक मुद्देयवतमाळातील स्थिती; शहराची सुरुवातच कोलाम पोडापासून, दुर्गम भागात पालिका पोहोचलीच नाही

  लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील लोहारा, पिंपळगाव, वाघापूर, वडगाव, भोसा, उमरसरा या ग्रामीण भागातील नव्या वसाहतींमध्ये ना धड रस्ते व वीज पुरवठा आहे. आता कुठे नव्या वसाहतीत नळाची पाईपलाईन टाकली जात आहे. नळ कधी येतील याचा पत्ता नाही. या नव्या वसाहतींमध्ये विकास कामांसाठी निधीची चणचण असल्याने नागरिकांना अगदीच प्राथमिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सांडपाण्याच्या नाल्या नसल्याने रस्त्यावरच गटार तयार झाले आहेत. माेठमोठ्या निवासी संकुलाचे सांडपाणी रस्त्यावरून जात आहे. अशा एक ना अनेक समस्या नगरपरिषदेत आहे. 
यवतमाळ शहराची सुरुवात होत असलेल्या प्रभाग क्र.१ मध्ये अगदीच दुर्लक्षित असे पोड आहेत. त्यात लोखंडबर्डी, उकंडा पोड, जामडोह, मासोळी पोड, करकडोह पोड, मोहा गावठाण, पहूर पुनर्वसन हा धामणगाव मार्गावरील परिसर येतो. येथे अजूनही बऱ्याच ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. तेथील नागरिकांनाही आपण जिल्हा मुख्यालयाच्या नगरपरिषदेत राहतो हे वास्तव माहीत नाही. आता काही भागात कामे होत आहेत. त्यावरच ती मंडळी समाधान मानत आहे. अशीच स्थिती लोहारा, वडगाव, पिंपळगाव, वाघापूर, भोसा, उमरसरा येथे नव्याने उदयास आलेल्या ले-आऊटमध्ये आहे. पावसाळ्यात जाण्यासाठी रस्ताच नसतो, तर पिण्याकरिता पाणी नसल्याने पायपीट करावी लागते. वीज पुरवठाही वारंवार खंडित होतो. बऱ्याच भागात पथदिवेही नाहीत.

रस्ता, वीज, पाण्याच्या समस्या कायमच
शहरात समाविष्ट झालेल्या सात ग्रामपंचायतींमध्ये नवीन ले-आऊट तयार झाले. आता तेथे नागरीकरण होत आहे. याठिकाणी रस्ते, नाल्या, वीज पुरवठ्याचे खांब उपलब्ध नाहीत. नगरपरिषदेचा विस्तार करताना आजूबाजूच्या सर्व घाटापर्यंतच्या सीमा पालिकेत समाविष्ट करण्यात आल्या. २०१६ मध्ये विस्तारलेल्या नगरपालिकेला या भागांमध्ये कुठलीच विकास कामे पोहोचविता आली नाही. आजही एखाद्या डोंगरदऱ्यात वसलेल्या आडवळणावरील वस्तीसारखी स्थिती येथील नागरिकांची आहे. नावालाच नगरपरिषद क्षेत्र असून ग्रामीण भागापेक्षाही समस्या गंभीर आहे. विकास शुल्क न भरताच ले-आऊट तयार झाल्याने आता त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना बसत आहे.

उकंडा पोडावर आतापर्यंत रस्ते, पाणी, वीज नव्हती. मात्र गेल्या दोन वर्षांत स्थानिक नगरसेवक विजय खडसे यांच्या पाठपुराव्याने ही कामे सुरू झाली आहेत. आमच्या येथे सर्व शेतकरी, शेतमजूर राहतात. शहरात आहोत हे आम्हाला अजूनही वाटत नाही. मेहनतीची कामे करून पोट भरणे हिच दिनचर्या आहे. घरकूल व इतर याेजना आलेल्या नाहीत. 
- दशरथ देवकर, उकंडा पोड

वडगावमध्ये येत असलेल्या इंद्रायणीनगर येथे अजूनही रस्ते, नाल्या, विजेचे खांब, नळ योजना पोहोचलेली नाही. एखाद्या दुर्गम भागात राहावे, अशी स्थिती आहे. पालिकेकडून कोणतीच सुविधा येथे दिली जात नाही. याठिकाणी घंटागाडी तर सोडाच सांडपाण्याच्या नाल्याही नाहीत. पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो.  
- अरुणा राऊत, इंद्रायणीनगर, वडगाव

शहराच्या विस्तारानंतर बराच मोठा भाग नगरपालिकेत जोडला गेला आहे. नव्या ले-आऊटमध्ये मुलभूत सोयीसुविधांची कामे होणे बाकी आहे. त्यासाठी नवीन विकास आराखडा तयार केला जात आहे. निधीची उपलब्धता होताच या भागातही सुविधा देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. शासनस्तरावरही पाठपुरावा सुरू आहे.
-ममता राठोड, उपमुख्याधिकारी, नगरपरिषद, यवतमाळ

या वसाहती बनल्या समस्यांचे माहेरघर

२०१६ मध्ये सात ग्रामपंचायती शहरात विलीन झाल्या. या भागातील विकास कामे तेव्हापासून ठप्प आहे. लोहारा, वाघापूर, वडगाव, पिंपळगाव, उमरसरा, भोसा येथील अनेक वसाहतींमध्ये मूलभूत सोयीसुविधाही पोहोचलेल्या नाहीत.

समस्या काय आहेत?

दुर्गम भागात असलेल्या वस्त्यांमध्ये नगरपरिषदेची कोणतीच यंत्रणा पोहोचत नाही. प्रभाग क्र.१ मध्ये येत असलेल्या उकंडा पोड, लोखंडबर्डी, जामडोह पोड, करकडोह पोड, मासोळी पोड येथे स्थानिक नगरसेवकाशिवाय कोणीच प्रत्यक्ष भेट दिलेली नाही. आदिवासी बहुल असलेला हा दुर्गम भाग कायम उपेक्षित राहिला आहे. काही ठिकाणी आता कुठे रस्ते होत आहे.

 

Web Title: No water, no roads in the new colonies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.