निम शिक्षकांना सहायक पदावर नियुक्तीचा ठराव
By admin | Published: July 12, 2014 01:52 AM2014-07-12T01:52:19+5:302014-07-12T01:52:19+5:30
अनेक वर्षांपासून निम शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना आता सहायक शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे.
यवतमाळ : अनेक वर्षांपासून निम शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना आता सहायक शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३२८ निम शिक्षकांना याचा लाभ देण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीमध्ये शाळेत अद्यापही पाठ्यपुस्तके पोहोचली नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. यु डायसवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार पंचायत समितीतील शाळांना पुस्तकांचा पुरवठा केला, असे सांगण्यात आले. ज्याठिकाणी प्रत्यक्ष पाठ्यपुस्तके मिळाली नाही तेथे तातडीने पुस्तके पोहोचविण्याचे निर्देश शिक्षण समितीने दिले आहे. याशिवाय निमंत्रित सदस्य दिगांबर जगताप यांनी बैठकीत शिक्षकांचे नियमित वेतन, पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित केला. पदोन्नतीसाठी समुपदेशनाने त्वरित प्रक्रिया पूर्ण करण्याचा ठराव समितीने घेतला. वणी येथील हिंदी व मराठी माध्यमाची शाळा एकत्रच भरते. या शाळांना स्वतंत्र करण्याचा ठराव समितीत घेण्यात आला. यानंतर शाळा-इमारत दुरुस्ती आणि बांधकामाचा आढावा घेण्यात आला. ज्या शाळांचे काम अपूर्ण राहिले आहे, त्यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचाही ठराव समितीने घेतला. जिल्ह्यात ६८४ शाळांमध्ये इयत्ता पाचवीची तुकडी तर १८४ शाळांमध्ये इयत्ता आठवीची तुकडी सुरू करण्यात येणार आहे. याचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. आर्णी व ढाणकी येथील शाळा या बाजाराच्या दिवशी सकाळी घेतल्या जात होत्या. ही बाब चुकीची असून नियमाप्रमाणे शनिवारीच सकाळी शाळा घेण्याचे निर्देश देण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)