एसटी कामगारांना पाल्यांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी पैसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:31 AM2018-09-11T11:31:35+5:302018-09-11T11:37:10+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कामगारांना मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनेअंतर्गत महामंडळातील सुमारे ८० हजार कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.
विलास गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कामगारांना मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनेअंतर्गत महामंडळातील सुमारे ८० हजार कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.
महामंडळातील वर्ग ३ आणि ४ मधील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. १२ वी नंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमासाठी अग्रीम रक्कम दिली जाणार आहे. अर्ज सादर केल्यानंतर केवळ दोन दिवसात ही रक्कम उपलब्ध होईल अशी सोय करण्यात आली आहे. कला, वाणिज्य, विज्ञान अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ५० हजार, तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता दोन लाख रुपयांपर्यंत अग्रीम दिले जाणार आहे. रक्कम मंजूर करण्याचे अधिकार विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत.
महाविद्यालयात प्रवेश घेतानाच ही रक्कम कामगारांना मिळणार आहे. मात्र शैक्षणिक शुल्क भरल्याची पावती सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या रकमेची वसुली पुढील महिन्यापासून केली जाणार आहे. कामगार कुठल्याही कारणावरून सेवेतून कमी झाल्यास शिल्लक रजेचा पगार किंवा इतर देयकातून वसुली करण्यात येणार आहे. तसे संमतीपत्र कर्मचाऱ्यांकडून घेतले जाणार आहे. एसटीच्या सेवेत पती-पत्नी असल्यास एकाच जणाला अग्रीम देण्यात येणार आहे. यातील एकाची सेवा समाप्त झाल्यास सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याकडून अग्रीम रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
दरवर्षी मिळणार अग्रीम
कामगाराच्या मुलाने तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असल्यास दरवर्षी कमाल ५० हजार रुपयांपर्यंत अग्रीम दिला जाणार आहे. पहिल्या वर्षीच्या अग्रीमाची शिल्लक अधिक दुसऱ्या वर्षाच्या अग्रीमाची रक्कम आणि तिसºया वर्षासाठी अग्रीम मंजूर करताना पूर्वीची वसुली विचारात घेतली जाणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या सेवेचा शिल्लक राहिलेला कालावधी तपासला जाणार आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यास मिळणाऱ्या वेतनापैकी किमान १/४ वेतन मिळेल याची दक्षता घेण्यात येणार आहे. वसुलीसाठी रकमेचे हप्ते पाडून दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या दोन पाल्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी ही रक्कम दिली जाणार आहे.