पुरस्कार रकमेत गैरप्रकार
By admin | Published: August 9, 2015 12:11 AM2015-08-09T00:11:55+5:302015-08-09T00:11:55+5:30
तंटामुक्त गाव म्हणून मिळालेल्या पुरस्काराची रक्कम अनेक ग्रामपंचायतींनी तंटामुक्त गाव समितीला विश्वासात न घेताच शासकीय निकष...
तंटामुक्त गाव : विनियोगाची माहिती देण्यास टाळाटाळ
मारेगाव : तंटामुक्त गाव म्हणून मिळालेल्या पुरस्काराची रक्कम अनेक ग्रामपंचायतींनी तंटामुक्त गाव समितीला विश्वासात न घेताच शासकीय निकष डावलून खर्च करून गैरप्रकार केल्याची माहिती हाती आली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी या पुरस्कार रकमेच्या खर्चात गैरप्रकार केला आहे.
मारेगाव तालुक्यात अनेक गावांनी तंटामुक्त होत पुरस्कार पटकाविले. गावातील लोकसंख्येनुसार हे पुरस्कार देण्यात येतात. संबंधित ग्रामपंचायतीने या पुरस्कार रकमेचा कसा विनियोग करावा, याबाबत शासनाने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहे. त्यानुसार पुरस्कार रकमेचा खर्च करावा लागतो. तालुक्यात जवळपास ३0 ग्रामपंचायतींनी आत्तापर्यंत पुरस्कार पटकाविले आहे. संबंधित पुरस्कार प्राप्त ३० ग्रामपंचायतीपैकी सन २०१३ पूर्वी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींनी पुरस्कार प्राप्त केले आहे.
या पुरस्कार प्राप्त २१ ग्रामपंचायतींना माहिती अधिकारात पुरस्कार विनियोगाची माहिती मागितली असता, प्रथम सर्वांनीच माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केले असता, प्रथम अपिल कोणी स्विकारावे यावरच खल करण्यात आला. त्यानंतर शेवटी कसे तरी अपिल स्विकारण्यात आले. येथील पंचायत समितीच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी मात्र त्या अपिलावर कोणतीही माहिती न देता व सुनावणी न करता संबंधित ग्रामसेवकांनाच अपिलकर्त्यांना तातडीने माहिती देण्याचे सूचित केले.
जनमाहिती अधिकाऱ्यांच्या आदेशाने विलंबाने का होईना सारवासारव करीत अखेर तालुक्यातील चिंचाळा, चिंचमंडळ, कोलगाव, कोथुर्ला, गोंडबुरांडा, आपटी, मार्डी, चोपन, कानडा, शिवणी, किन्हाळा, घोडदरा, घोगुलदरा या १३ ग्राम पंचायतींच्या सचिवांनी पुरस्कार विनियोगाची अखेर माहिती दिली. त्यापैकी घोगुलदरा, कानडा या ग्रामपंचाय्त्तींनी तर पुरस्कार रकमेचा अद्याप छदामही खर्ची घातला नसल्याचे उाड झाले. पुरस्कार रकमेचा विनियोग सादर करणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींकडे अद्याप मोठी रकम तशीच पडून आहे.
याशिवाय उर्वरित जळका, सुर्ला, केगाव, बोटोणी, गोधणी, टाकळी, हिवरा, वेगाव ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक या पुरस्कार रकमेचा विनियोग सादर करण्यास अद्याप टाळाटाळ करीत आहेत. परिणामी त्या ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात जमा असणाऱ्या पुरस्कार रकमेचा गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. संबंधित ग्रामसेवकांविरूद्ध आता राज्य माहिती आयुक्तांकडे अपिल दाखल केल्या जाणार असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
तालुकास्तरीय समिती चौकशी करणार
तालुक्यात सन २०१२-२०१३ या वर्षात कुंभा, २०१३-२०१४ या वर्षात मांगरूळ, मच्छिंद्रा, दांडगाव, गौराळा, मजरा, सिंधी (महागाव) शिवनाळा, हिवरी या नऊ ग्रामपंचायतींनी तंटामुक्त गाव पुरस्कार पटकाविले. त्यांना यावर्षी तंटामुक्त पुरस्कार रकमेचे धनादेश बहाल करण्यात आले. आता या ग्रामपंचायतींनी शासन निकषाचे अधिन राहून परिशिष्ट ७ प्रमाणे पुरस्कार रकमेच्या खर्चाला ग्रामसभेतून मंजुरी घेऊनच पुरस्कार रकमेचा विनियोग करून पुढील कारवाई टाळणे गरजेचे आहे. आता तालुकास्तरीय तंटामुक्त समिती पुरस्कार प्राप्त संबंधित सर्व ग्रामपंचायतींना भेट देऊन पुरस्कार रकमेच्या विनियोगाची लवकरच तपासणी करणार असल्याचे समितीचे सचिव पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले.